scorecardresearch

गृहिणींना मसाला बनविण्यासाठी दिलासा; घाऊक बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर ५०-१००रुपयांनी उतरले 

वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या लाल मिरची, गरम मसाले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Red chilli prices down in apmc market
लाल मिरची संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पूनम सकपाळ , नवी मुंबई 

उन्हाळ्यात महिलांची मसाला बनविण्यासाठी लाल मिरची, त्यासाठी लागणारे गरम मसाला पदार्थ घेण्यास लगबग सुरू होत असते. यंदा महिलांना मात्र मसाला बनविण्यासाठी दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी लाल मिरचे दर वधारले होते यंदा मात्र घाऊक बाजारात कमी झाले असून ५०-१०० रुपयांनी उतरले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक चांगली असल्याने भाव वधारले नाहीत अशी माहिती मसाला व्यापारी यांनी दिली आहे.

वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या लाल मिरची, गरम मसाले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिनाअखेर तसेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लाल मिरची, गरम मसाले पदार्थ खरेदीला गृहिणींची लगबग सुरू होते. फेब्रुवारी अखेर पासून एपीएमसी मसाला बाजारात कर्नाटक, बंगळुरू, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात लाल मिरची दाखल होण्यास सुरुवात होते. बाजारात सध्या ४ हजार ते ५ हजार लाल मिरची आवक होत आहे. लाल मिरचीमध्ये पांडी, लवंगी, बेडगी, काश्मिरी, शंकेश्वरी यांची आवक होते. यामध्ये महिला लवंगी, काश्मिरी, बेगडी, शंकेश्वरी मिरचीला अधिक पसंती देतात. महिला वर्षभराचा मसाला एकदाच करून ठेवतात. कमीत कमी ४ ते ८ किलो मसाला तयार करण्यात येतो. यावर्षी घाऊक बाजारात बेडगी आणि लवंग मिरचीचे दर उतरले आहेत. मागील वर्षी बेडगी ४००-६५०होती परंतु यंदा २५० ते ५५०रुपयांनी उपलब्ध आहे. तर लवंगी मिरची २७०-२८०रुपयांनी होती ती आता २३०-२४०रुपयांनी विक्री होत आहे. पांडी मिरची २४०-२५०रु आणि काश्मिरी मिरची ५००-६००रु तर रेशमपट्टी ६५०-७५०रुपये किलोने झाली आहे. 

हेही वाचा >>> जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध आदिवासी महिलेचे बेमुदत उपोषण; आदिवासींची जमीन बिगर आदिवासींच्या नावे

लवंग, काळीमिरी दरवाढ

मसाला बनविण्यासाठी लाल मिरची बरोबर लागणाऱ्या काही गरम मसाल्यात दरवाढ झाली आहे. यामध्ये यंदा लवंग आणि काळीमिरी दरात वाढ झाली आहे.तर धणे, दालचिनी, दगडी फुल, त्रिफळ, हळकुंड, दर स्थिर आहेत. गरम मसाल्यामध्ये लवंग मागील वर्षी ६५०-७५०रुपये होते ठेवआता ७५०-८५०रु ,धणे आधी १२०-१७०रुपयांनी उपलब्ध होते ,आता १००-१५०रु, दालचिनी २५०ते ३५०रु , काळीमिरी आधी ४५०-५००रु होती ती आता ५००-५५०रु , त्रिफळ ४००-६००रु ,दगडी फुल ३६०-५००रु आणि हळकुंड १२०ते १७०रुपये प्रतिकिलोनी विकले जात आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात आंध्र प्रदेश आणि कर्नाटक इथून मोठ्या प्रमाणावर लाल मिरची दाखल होते. बाजारात लाल मिरची हंगाम सुरू झाला असून यंदा मागील वर्षाच्या तुलनेत मिरचीचे दर ५० ते १०० रुपयांनी उतरले आहेत. परंतु पुढील कालावधीत मागणी वाढताच प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी दर घसरण किंवा वाढण्याची शक्यता आहे.अमरीश बारोत, घाऊक व्यापारी, मसाला बाजार एपीएमसी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 23:02 IST