उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे माल बाजारात पडून

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात लाल मिरच्यांची आवक वाढली आहे. मागणी कमी असल्याने मिच्र्याचे भाव उतरू लागले आहेत. साधारणपणे दरवर्षीच या महिन्यात मसाला बाजारात मंदी असते, मात्र यंदा दरवर्षीच्या तुलनेत आवक वाढली आहे. निर्यात कमी आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मिच्र्या यार्डात पडून आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेश येथून मिरचीची आवक होते. या दोन्ही राज्यांत मिरचीचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यामुळे येत्या काळात लाल मिच्र्याचे भाव उतरणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

२०१५ साली अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले होते, त्यामुळे दीड वर्षांपासून मिरचीचे भाव तेजीत होते. यंदा पाऊस समाधानकारक पडल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन जास्त झाले आहे. लाल मिरची आणि मसाल्यांचेही चांगले उत्पादन झाले आहे. घाऊक बाजारात नोव्हेंबरपासून थोडय़ाफार प्रमाणत मिरचीची आवक होते. एप्रिल आणि मेमध्ये मिरची आणि मसाल्यांना जास्त मागणी असते. घाऊक बाजारात गेल्या वर्षी १५० ते २०० रुपये प्रतिकिलो असलेली मिरची आजघडीला किमान ७० ते १०० आणि कमाल ११० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मिरचीचे भाव ४० ते ५० रुपयांनी कमी होतील अशी अपेक्षा आहे. वाशी बाजारात दरमहा ३५० गाडय़ांची नोंद होते.

एका आठवडय़ात सुमारे ३५ किलोच्या ५ लाख गोण्या बाजारात येतात. शंकेश्वरी आणि पांडी मिच्र्या अद्याप बाजारात आलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी गंटूर मिरचीचा पर्याय उपलब्ध आहे. या मिरचीची आवक जास्त होत आहे.

यावर्षी भरघोस पडलेल्या पावसामुळे मिरची आणि मसाले यांचे उत्पादन चांगले झाले आहे. एपीएमसी बाजारात जास्त प्रमाणात मिरची आणि मसाल्यांची आवक झाली आहे. तसेच मागणीही कमी आहे. जादा माल पडून आहे. मिरचीचे भाव लवकरच उतरतील, अशी अपेक्षा आहे.

– कीर्ती राणा, व्यापारी, मसाला मार्केट, एपीएमसी वाशी

[jwplayer Za2fQPsP-1o30kmL6]