नेरुळ येथील वंडर्स पार्क हे नवी नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई  या परिसरातील शहरातील नागरीकांसाठी एक महत्वपूर्ण असं प्रेक्षणीय ठिकाण आहे. करोनाची साथ येण्यापूर्वी या ठिकाणी नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. मात्र  गेल्या अडीच वर्षापासून वंडर पार्क सर्वसामान्यांसाठी बंद आहे. याच पार्कमध्ये दररोज मॉर्निंग वॉक करणाऱ्या वॉकर्सची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.करोना प्रादुर्भाव कमी झाला असून आता सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. सध्या दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या या पार्कमध्ये किमान वॉकर्सना नियमानुसार पास देऊन सकाळी चालण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीच्या पाचही बाजार समितीचा होणार पुनर्विकास ; संचालक मंडळाच्या हालाचाली सुरु

नवी मुंबई महापालिकेचे हे पार्क २०११ ला सुरु झाले. त्याठिकाणी असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह  अँम्पीथिएटर, आकर्षक तलाव, खेळण्यासाठी असलेली प्रशस्त  जागा यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. सध्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित,ऑडिओ व्हिज्युएल यंत्रणा नविन बसविणे,तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे प्रकार बसवणे,खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिवे लावणे, उद्द्यानात आकर्षक कारंजे  सुधारणा अशी जवळजवळ २o कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कची सुधारणा करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : किल्ली कपाटालाच राहीली, चोरांनी मारला डल्ला, १८ लाखांची चोरी

वंडर्स पार्कमध्ये सकाळी चालण्यासाठी नागरीकांना मासिक व वार्षिक पास देण्यात येत होते. एका महिन्यासाठी ५० रुपये तर वार्षिक ५०० रुपये पास देण्यात येत होता. त्यामुळे पास काढून या पार्कमध्ये जाणाऱ्यांची संख्या १२५० पर्यंत होती. आता याच परिसरात तसेच ,पारसिक हिल या भागात नागरीक मॉर्निंग वॉक करतात. आतमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे चालली असली तरी बाजुला असलेला ट्रॅक चालण्यासाठी खुला करुन देण्यात यावा अशी मागणी येथील वॉकर्सकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क बरोबरच रॉक गार्डन निसर्ग उद्यान घणसोली पार्क, संवेदना उद्यान अशी अनेक उद्याने नागरिकांसाठी आहेत.परंतू सकाळी चालण्यासाठी विस्तीर्ण असलेल्या या वंडर्स पार्कमध्ये गर्दी व्हायची.आता आम्हालाही लवकरात लवकर मॉर्निंग वॉकसाठी तात्काळ वंडर्स पार्कमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.१५ डिसेंबर २०११ रोजी वंडर्स पार्क नवी मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून खेळण्यांसोबतच वंडर्स पार्कला नवा लुक देण्यात आलेला आहे. वॉकर्सची लवकरात लवकर हे  पार्क सुरु करण्याची मागणी आहे. प्रशासनाने लवकरात लवकर  हे पार्क सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे . – रवींद्र इथापे ,माजी सभागृह नेते

करोनासुरु झाल्यापासून हे पार्क बंद करण्यात आले आहे. आता सर्वत्र निर्बंधमुक्त करण्यात आले असून वंडर्स पार्कच्या आतील दुरुस्ती व इतर बांधकामे सुरु राहू द्या,  पण चालण्यासाठी असलेला ट्रॅक सुरु करावा. – सुनील कोडेकर, वॉकर्स,सीवूड्स

आम्ही ज्येष्ठ नागरीक पास काढून दररोज वंडर्स पार्कमध्ये चालण्यासाठी जात होतो.पार्कमध्ये चालणे नक्कीच रस्त्यावरील चालण्यापेक्षा सुरक्षित आहे. पालिकेने लवकरात लवकर आम्हाला वॉकिंग ट्रॅक खुला करुन द्यावा. – हमीद खानजादा, स्थानिक वॉकर्स

वंडर्स पार्क येथे मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत असून  दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.वंडर्स पार्क सर्वसामान्यांसाठी डिसेंबर अखेरपर्यंत खुले करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. येथील काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचे आकर्षण असलेले हे पार्क लवकरात लवकर खुले करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.त्यामुळे वॉकर्सनीसुध्दा अजून काही दिवसांसाठी संयम ठेऊन प्रशासनाला मदत करावी. लवकरात लवकर हे पार्क सुरु  करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.- गिरीश गुमास्ते ,कार्यकारी अभियंता, नेरुळ