नेरुळ पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर मोडीत निघालेल्या रिक्षांना बनावट क्रमांक आणि जुने इंजिन लावून प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन बेकायदा रिक्षाचालकांवर नवी मुंबई परिवहन विभागाने कारवाई केली आहे. तीन दिवसांपूर्वी येथील रिक्षाचालकांनी या बोगस रिक्षाचालकांच्या विरोधात आंदोलन केले होते.

नवी मुंबईत सुमारे पाच हजार रिक्षाचालक असून यात काही बोगस रिक्षाचालकांचा भरणा आहे. नवी मुंबई परिवहन उपप्रादेशिक अधिकारी संजय डोळे यांनी रिक्षाचालकांची झाडाझडती सुरू केली असून मंगळवारी नेरुळचे साहाय्यक वाहतूक पोलीस अधिकारी नितीन पाटील यांच्यासमवेत येथील रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांची तपासणी केली. त्यात चंदू उगलमुगले याची रिक्षा क्रमांक एमएमच ४३ सी ५८७६ व तानाजी लोमटे याची रिक्षा क्रमांक एमएच ४३ सी ९२९५ ह्य़ा दोन रिक्षा तपासाअंती बोगस असल्याचे आढळून आले. यातील पहिल्या रिक्षांसाठी लावण्यात आलेले क्रमांक, चेसी, इंजिन क्रमांक दुसऱ्याच्या नावावरील असून दुसऱ्या रिक्षाचे कोणतेही क्रमांकच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले.