नवी मुंबई : जलसंपन्न शहर म्हणून बिरूदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण यावर्षी २४ सप्टेंबरला १०० टक्के भरले व धरणातून १९.०८७ घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून पाणी उपसा करण्याच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त पंप लावून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के धरण भरूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात कमी जलसाठा शिल्लक आहे. परिणामी, उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ नवी मुंबईकरांना सोसावी लागेल, अशी भीती आहे.
मोरबे धरण सप्टेंबर महिन्यात यंदा १०० टक्के भरले. शहरातील लोकसंख्येच्या मानाने शहरात अतिरिक्त पाणीपुरवठा केला जात आहे. पालिका प्रशासनाकडून धरणातील पाणी उपसा करण्याच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे एकीकडे शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेलाचा धोका असून पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे.
हेही वाचा – मुंबई मेट्रो एवढे नवी मुंबई मेट्रोचे तिकीट भाडे ठेवा
धरणाच्या ठिकाणी असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा करणे तसेच जलशुद्धीकरण करणे व त्याचे वितरण करणे यामुळे केव्हाही पाणीपुरवठा यंत्रणेतच मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिका आयुक्तांसह शहर अभियंता विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी याकडे गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
मोरबे धरणातील पाणी उपसा क्षमता ४५० एमएलडी असताना धरणातून तब्बल ५०१ एमएलडी पाणी उपसा केला जातो. ४५० एमएलडी पाणी उपशासाठी मोठ्या क्षमतेच्या ६ पंपांची क्षमता आहे तिथे सातवा अतिरिक्त पंप लावून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेला बाधा पोहोचू शकते.
हेही वाचा – पावसाने उरणच्या हवामानात सुधारणा; गुणवत्ता निर्देशांक ३९ वर
धरणातून प्रक्रिया न केलेले पाणी मोरबे येथून भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही ४५० एमएलडी आहे. तेथेही जलशुद्धीकरण क्षमतेपेक्षा अतिरिक्त म्हणजेच ५०१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाण्यावर भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्याने या केंद्रावरही अतिरिक्त ताण आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोरबे धरणापासूनची शहरापर्यंतची पाणीपुरवठा व्यवस्था ४५० दशलक्ष क्षमतेची असल्याने अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे भविष्यात जलवाहिन्याही फुटण्याचा धोका आहे.
मोरबे धरणातून घेतल्या जाणाऱ्या पाण्याबाबतची स्थिती
- ५०१.३९ एमएलडी
धरणातून दररोज घेतले जाणारे प्रक्रिया न केलेले पाणी
- ४९७.३९ एमएलडी
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात येणारे प्रक्रिया न केलेले पाणी
- ४८१.९९ एमएलडी
कळंबोली जंक्शनपर्यंत येणारे प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी
- ४२९.८९ एमएलडी
नवी मुंबई शहरासाठी पाणी
- ६४ एमएलडी
एमआयडीसीकडून पालिकेला मिळणारे पाणी
- ५५ एमएलडी
प्रक्रियायुक्त पाणीपुरवठा
यंदा मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. धरणातून अतिरिक्त होणाऱ्या पाणी उपशाबाबत योग्य काळजी घेण्यात येईल. शहर अभियंता विभागाला पाणी नियोजनाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात येतील. – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका