सेनेकडून आक्रमक प्रयत्न, पालकमंत्र्यांचीही साथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आवाजी मतदानाने मंजुर करण्यात आलेला अविश्वास ठराव राज्य सरकारने निलंबीत केल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहरातील काही प्रकल्पग्रस्त नेत्यांची मोट बांधत मुंढे यांच्याविरोधात नव्याने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या विवीध मागण्यांसाठी नेहमीच अगेसर राहीलेल्या संघर्ष समितीच्या नेत्यांची एक बैठक रविवारी दुपारी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आली होती. मुंढे यांच्याविरोधात मोहीम राबविणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी जोर लावल्याचे वृत्त असून महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. या बैठकीनंतर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई होऊ दिली जाणार नाही, असा शब्द पालकमंत्री िशदे यांनी उपस्थितांना दिला असला तरी प्रकल्पग्रस्तांच्या आडून मुंढेंवर निशाणा साधण्याचा हा पयत्न असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

नवी मुंबईतील गावे तसेच शहरी भागातील सिडको वसाहतींमध्ये झालेल्या बेकायदा बांधकामामुळे शहराचे नियोजन खिळखीळे होऊ लागले असून महापालिका, सिडको तसेच एमआयडीसीमधील आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नवी मुंबईलाही कळवा-मुंब्यासारखी अवकळा येऊ लागली आहे. नवी मुंबईतील गावांतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न वर्षांनुर्षे प्रलंबित असला तरी काही ठरावीक घटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बेसुमार बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. मुंब्रा परिसरातील लकी कंपाउंड भागात अशीच एक बेकायदा इमारत कोसळून त्याखाली ७४ जणांना पाण गमवावे लागले होते. त्यानंतर नवी मुंबईतील ग्रामीण भागातही कोणत्याही परवानगीविना उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, त्यानंतरही ही बांधकामे सुरूच आहेत.

दरम्यान, नव्याने उभ्या रहात असलेल्या अशाच काही बांधकामांना मुंढे यांनी हात घालताच बिथरलेल्या राजकीय नेत्यांनी मध्यंतरी नवी मुंबई बंदची हाक दिली होती. तसेच मुंढे यांना कोंडीत पकडण्याचे उद्योगही सुरु झाले होते. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी या पश्नी लक्ष घालत २०१२पर्यंत उभारण्यात आलेल्या बांधकामांना अभय देण्याची घोषणा केल्यामुळे महापालिकेने सद्यस्थितीत कारवाईची तलवार म्यान केली आहे. मात्र, अविश्वास ठरावाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांचा भावनिक मुद्दा पुढे करत मुंढे यांना कोंडीत पकडण्याचे उद्योग सुरु झाल्याची चर्चा आहे. महापालिकेतील मुंढे विरोधी नेत्यांनी रविवारी प्रकल्पग्रस्त नेत्यांची मोट बांधत त्यांना पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यापुढे हजर केले. यावेळी मुंढे हे प्रकल्पग्रस्तविरोधी आहेत तसेच त्यांच्यामुळे गरजेपोटी उभारण्यात आलेल्या बांधकामांना धोका आहे, असे चित्रही रंगविण्यात आल्याचे बोलले जाते. त्यानंतर गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कोणतीही टाच येणार नाही, असे आश्वासन पालमकंत्र्यांनी या नेत्यांना देऊन बैठकीचा फार्स उरकल्याचे समजते. यासंबंधी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे नेते डॉ.राजेश पाटील यांच्याशी वारंवार संपक साधण्याचा पयत्न करुनही तो होऊ शकला नाही. राष्ट्रवादीचे नेते जयवंत सुतार यांनी फोन उचलला नाही तर शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी आपण मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याने त्या बैठकीला हजर नव्हतो, असे सांगितले.

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena and ncp not happy with tukaram mundhe
First published on: 08-11-2016 at 00:50 IST