करोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करताना आकारण्यात आलेल्या अवाजवी देयकांविरोधात पालिकेकडे तक्रार केल्यानंतर केलेल्या चौकशीत दहा रुग्णालयांची देयकांत दोष आढळून आल्याने पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खासगी रुग्णालयांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मागील महिन्यापासून पालिका क्षेत्रात प्रतिजन चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यातील काही रुग्ण हे खासगी उपचार घेत असून ही संख्या दीड हजाराच्या घरात आहे. नवी मुंबईत अपोलो, एमजीएम, डी. वाय. पाटील. तेरणा, फोर्टिज, रिलायन्स यासारखे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असून २०० इतर खासगी रुग्णालय कार्यरत आहेत.
एप्रिलपर्यंत यातील अनेक रुग्णालये बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सरकारच्या आदेशाने सुरू करण्यात आली. सुपर स्पेशालिटी रुग्णालये तर पहिल्या दिवसापासून कोविड रुग्णांना उपचार करीत आहेत. यातील वाशी येथील एमजीएम रुग्णालयाने मात्र करोनेतर रुग्णांसाठी रुग्णालय राखीव ठेवले होते. नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार करताना अवाजवी रकमेची देयके आकारलेली आहेत. करोना रुग्णांसाठी वेगळी अशी उपचार पद्धती नाही. त्यामुळे राज्य सरकारने २२ मे रोजी एक अध्यादेश काढून सर्व खासगी रुग्णालयांनी ठरवून देण्यात आलेल्या दराप्रमाणे रुग्णांची देयके घ्यावीत, असे आदेश दिले होते. सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी काही रुग्णालये करीत असताना काही रुग्णालये मात्र मेडिक्लेम असल्याने रुग्णांकडून जादा रकमेची देयके आकारत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे केल्या आहेत. त्यातील दहा रुग्णालयाच्या देयकांची तपासणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केली. त्यात ही बाब उघड झाली आहे.
..तर परवाने रद्द
या रुग्णालयांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. या चौकशीनंतरही ही रुग्णालये दोषी आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याची तरतूद साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत पालिकेला आहे. या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावताना पालिकेने त्यांची ओळख मात्र उघड केलेली नाही. ही ओळख जाहीर करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली असून त्यामुळे इतर रुग्णालयांना त्याचा चाप बसण्याची शक्यता आहे.