सृष्टी कुलकर्णीचा कथासंग्रह प्रसिध्द
कर्करोगाने आयुष्य संपत नाही तर आयुष्य जगण्यासाठीची नवी उमेद मिळते, असा आशावाद पनेवलमधील सृष्टी यशवंत कुलकर्णी या विद्यार्थिनीने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दिला आहे. गेले १८ महिने स्वत: कर्करोगासारख्या आजाराशी झुंज देताना सृष्टीने बीएस्सीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर जपानी भाषेसोबतच मराठीत कथासंग्रह लिहिण्याची किमया देखील तिने साध्य केली आहे. त्यामुळे तिचा हा लढा इतरांना देखील प्रेरणादायी ठरत आहे.
मूळची सांगली येथील असणारी सृष्टी बारावीनंतरच्या शिक्षणासाठी पनवेलमधील तिच्या आजीकडे आली होती. दहावीत ९४ तर बारावीत ८० टक्के गुण मिळविणाऱ्या सृष्टीला चांगू काना ठाकूर महाविद्यालयात शास्त्र विभागात प्रवेश मिळाला होता. पण मार्च महिन्यात तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मात्र अशा कठीण प्रसंगातही तिचे नातेवाईक आणि आजी यांनी सृष्टीला खंबीरपणे साथ दिली. तिला काव्यलेखन आणि वाचन याची आवड असल्याने या आजारांशी दोन हात करताना जपानी भाषा शिकण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले गेले. नेहा खरे या शिक्षिकांकडून सृष्टीने जपानी भाषेचे शिक्षण घेतले असून मराठी भाषेतूनच ‘कॅलीडोस्कोप’ हा आगळावेगळा कथासंग्रह देखील लिहिला आहे. कोल्हापूरच्या ‘अभिनंदन’ पब्लिकेशनने नुकताच हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.
आजीची साथ मोलाची
सृष्टीची आजी मंगला कुलकर्णी या माजी मुख्याध्यापिका व लेखिका आहेत. त्यांच्या ‘शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे’ या पुस्तकाला २०१४ चा राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्यवाङ्मय पुरस्कार व दोन वेळा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे.