नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-६ मधील शुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी (११ ऑगस्ट) लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने अग्निशमन दलाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशमन दलाने गेल्या दोन वर्षांत वारंवार नोटिसा बजावूनही रुग्णालय प्रशासनाने अग्निसुरक्षेतील उणीवा दूर केल्या नाहीत, उलट नियमबाह्य बदल आणि बांधकामे केल्याचे तपासात उघड झाले आहे.
२५ वर्षांहून अधिक काळ नेरुळमध्ये कार्यरत असलेल्या या तीन मजली रुग्णालयाची ४०० चौरस मीटर जागा नियमबाह्यरीत्या वापरल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांना आढळून आले. रुग्णालयाच्या तळघरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तापसणीत, मंजूर नकाशानुसार ठेवायची मोकळी जागा अडवून छत बांधल्याचे आढळून आले, त्यामुळे आग लागल्याच्या वेळी अग्निशमन दलाला शिडी लावण्यासाठीही जागा उपलब्ध झाली नाही. तसेच तळघरात अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसताना क्ष-किरण यंत्रणा, एमआरआय उपकरणे आणि कागदांसारखा ज्वलनशील पदार्थांचा साठा ठेवण्यात आला असल्याचेही अग्निशमन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
आगीनंतरच्या तपासणीदरम्यान इमारतीच्या छतावर सोलर पॅनल बसवून लोडबेरिंगच्या साहाय्याने कायमस्वरूपी शेड आणि खोल्या तयार करण्यात आल्याचे आढळून आले. शिवाय, त्याच ठिकाणी नियमबाह्य स्वयंपाकघर आणि तीन व्यावसायिक गॅस सिलिंडरही आढळले. तसेच, इमारतीच्या पायऱ्यांवरही बांधकाम झाल्याने बचावकार्यालाही अडथळे आले. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा मुख्य अग्निशमन पंपच इमारतीत नसल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत आढळून आले आहे.
नोटिसांकडे दुर्लक्ष
अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार, तळघरातील (बेसमेंट) अडगळ आणि नियमबाह्य बांधकाम हटवण्यासाठी ११ जुलै २०२३ रोजी पहिली, तर ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुसरी नोटीस रुग्णालयाला देण्यात आली होती. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागासह आयुक्त, उपायुक्त आणि नगररचना विभागालाही पत्र पाठवण्यात आले. यानंतर १ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही रुग्णालयातील धोक्याची माहिती देण्यात आली. मात्र, वारंवार देण्यात आलेल्या सूचनांनंतरही रुग्णालयाकडून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत. असे अग्निशमन दलाने रुग्णालयाला नुकत्याच बजावलेल्या नोटीसीवरून स्पष्ट होते आहे.
अग्निशमन लेखपरीक्षणासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत आम्ही ‘ब’ प्रमाण पत्रासाठीचा अर्ज अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. त्यानुसार, आगीच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच अग्निशमन दलाकडून रुग्णालयातील अग्निशमन सुरक्षा यंत्रणेची तपासणी अपेक्षित होती. परंतु, त्या आधीच आगीची दुर्घटना घडली. आता अग्निशमन दलाकडून मिळालेल्या सूचनांनुसार आम्ही योग्य ती पावले उचलणार आहोत.अश्विनी कुलकर्णी, रुग्णालय व्यवस्थापक, शुश्रूषा रुग्णालय नेरुळ
“आगीची घटना घडल्यानंतर रुग्णालयाची तपासणी केली असता इमारतीच्या बांधकामात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली असून, येत्या ४० दिवसांत सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा अग्निशमन दलाकडून नियमोचित कारवाई करण्यात येईल असेही रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट केले आहे.” रोहन कोकाटे, केंद्र अधिकारी, अग्निशमन दल वाशी