बेलापूर, ऐरोलीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे
शारीरिक व्यंगावर मात करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर विशेष मुले स्वावलंबनाचे धडे गिरवत आहेत. बेलापूर आणि ऐरोलीतील विशेष शाळेतील या विद्यार्थ्यांचे हात उत्साहाने दिवाळीच्या तयारीला लागले आहेत.
मुलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाचे मूल्य रुजविणे, हा यामागचा हेतू असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. हा उपक्रम गेल्या २५ वर्षांपासून संस्था राबवत आहे. या माध्यमातून मुलांना संभाषण, आकलन, मोटार स्किल म्हणजे हालचालींविषयी शिक्षण दिले जाते. ऐरोलीतील सेक्टर-१८ येथील संजीवन पॅराप्लेजिक फाऊंडेशनच्या १६ मुलांनी विविध कलाकृती साकारल्या आहेत.
यात राख्यांबरोबरच विविध आकाराची फुले, कागदाच्या पिशव्या, तोरणे पणत्या, मेणापासून बनविलेले दिवे, वेष्टन, फुले, कागद क्लिपपासून बनवलेल्या पणत्यांचा समावेश आहे.
पणत्या, मेणाच्या दिव्यांची किंमत प्रत्येकी २०पासून अशी आहे. परिसरातील शाळा आणि कंपन्यांमध्ये याचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या वस्तू एल टी, पटनी, गेब्स यांसारख्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या शाळेतील मुले चिंचपाडा, ऐरोली गावातील झोपडपट्टी भागातील आहेत. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांना देण्यात येत असल्याची माहिती शिक्षिका पायल गंगवान यांनी दिली.
बेलापूरमधील सेक्टर-८ मधील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या ‘फाल्गुनी व्होकेशनल युनिट’च्या ३५ मुलांनी बनविल्या आहेत. यात दिवे, मेणबत्त्या आणि दागिन्यांचा समावेश आहे. कानातील दागिने, बांगडय़ा तसेच विविध आकाराच्या पणत्या, दिवे आणि मेणापासून बनविलेल्या पणत्याही तयार करण्यात आल्या आहेत. या वस्तूंची किंमत २० ते ९५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती प्रशिक्षक सुनील मारवा यांनी दिली.