दुष्काळग्रस्तांसह गडचिरोली जिल्ह्य़ासारख्या दुर्गम भागातील आदिवासी व गरिबांच्या मदतीसाठी नवी मुंबई पोलिसांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्या जिल्ह्य़ातील गरिबांना राज्याच्या इतर भागांतून पोलिसांच्या माध्यमातून काही मदत होऊ शकते का, याबाबत राज्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांना निवेदन दिले होते. याआधारे हा उपक्रम होत आहे. या उपक्रमांतर्गत जुनी भांडी वा जुने कपडे देऊन नागरिकांना ही मदत करता येईल.
या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन दीक्षित यांनी राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तांना केले होते. यानुसार नवी मुंबई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
पनवेल, उरणसह नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये २४ ऑक्टोबपर्यंत हा उपक्रम सुरू असेल. प्रत्येक पोलीस ठाण्यामधील एक कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आला आहे. पनवेल व खारघरमधील सामाजिक संघटना आणि तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन (टीएमए) ही उद्योजकांची संस्था या कामी सहकार्य करीत आहे. टीएमएचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील सर्व कारखान्यांमधील कर्मचारी व व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना पोलिसांच्या या मदतकार्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस उपायुक्त पांढरे यांनी त्यांच्या पुण्यातील सेवाकाळात गुडविल इंडिया व सावित्री फोरम या संघटनांची मदत घेतली होती. या वेळीही या दोन संघटना पोलिसांना सहकार्य करणार आहेत. पोलिसांनी पनवेलमधील कल्पतरूसारख्या मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशांनाही आवाहन केले
आहे.
* नवी मुंबईतील कोणत्याही पोलीस ठाण्यात मदत जमा करण्याची सोय
* वापरलेले कपडे व जुन्या भांडय़ांच्या माध्यमातून मदत, मात्र कपडे व भांडी चांगल्या अवस्थेतील असणे अपेक्षित
* मोठय़ा सोसायटय़ांमधील एकत्रित मदत नेण्यासाठी पोलिसांचे सहकार्य