नवी मुंबई : गेले वर्षभर चर्चेत असलेल्या लिडार सर्वेक्षणाला नवी मुंबईत अखेर सुरुवात झाली असून सर्वेक्षणाचे काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामावर पालिका आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
महापालिकेच्या इतिसाहासात प्रथमच शहरातील सर्व मालमत्तांचे लाइट डिटेक्शन ॲन्ड रेंजिंग टेक्नॉलॉजी अर्थात लिडार सर्वेक्षण होत असून आगामी आर्थिक वर्षांतील मालमत्ता कराची देयके ही या नव्या सर्वेक्षणानुसारच देण्यात येणार आहेत.
महापालिकांच्या उत्पन्नाचा स्रोत हा मालमत्ता कर असतो. प्रत्येक मालमत्तेवर योग्य कर आकारणी व त्याची वसुली केली तरच शहराच्या मालमत्ता करामध्ये वाढ होऊन शहर विकासासाठी, नागरी सुविधांची कामे करता येणार आहेत. १९९२ साली पालिका अस्तित्वात आल्यापासून शहरात मालमत्तांची प्रचंड वाढ झाली, परंतु त्या पटीत मालमत्ताकरांमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन हे सर्वेक्षण करीत आहे. यामुळे शहरातील मालमत्तांची ठोस आकडेवारी प्राप्त होणार आहे.
महापालिकेच्या अभिलेखाप्रमाणे शहरात फक्त ३ लाख २३ हजार मालमत्ता असून त्यावर कर आकारणी होत आहे. ज्या मालमत्ता भाडय़ाने दिलेल्या आहेत अशा मालमत्तांवर पालिकेच्या नियमानुसार मालमत्ता आकारणी न होता सरळ पध्दतीने कर आकारणी केली जात आहे. नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे येथे सिडकोने बांधलेल्या बैठय़ा घरांचे रूपांतर तीन ते पाच मजली इमारतीत झालेले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवासी इमारतीत विनापरवाना वाणिज्य वापर केला जात आहे. मात्र त्यावर नियमानुसार कर आकारणी होत नाही. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत आहे. या सर्वेक्षणामुळे शहरात नेमक्या किती मालमत्ता आहेत, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
८०४ कोटींचे लक्ष्य
मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून २०२२-२३ मध्ये मालमत्ताकरातून ८०४ कोटीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. उत्पन्नवाढीत लिडार सर्वेक्षण महत्त्वाचा घटक ठरणार आहे. आगामी आर्थिक वर्षांतील मालमत्ता कर देयके या सर्वेक्षणानुसार देण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण केले जात असून संबंधित कामाला सुरुवात झाली आहे. हे काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्पन्नातही निश्चित वाढ होणार असून याबाबत लवकरच एक बैठक घेतली जाणार आहे.-अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका