संरक्षण मागण्यास गेलेल्या सोनावणे कुटुंबियांना पोलिसांचा ‘सैराट’ दम
प्रेमप्रकरण थांबविण्यासाठी फोनवरून धमकी देणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांपासून संरक्षण मिळविण्यासाठी सोमवारी सायंकाळी सोनावणे कुटुंबीयांनी नेरुळ पोलीस ठाण्यात पोहोचले. धमकीची तक्रार देण्याचा सोनावणे यांनी प्रयत्न केला होता; परंतु येथील पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू आणि पोलीस अधिकारी माने यांनी सोनावणे कुटुंबाची दखल सोडाच; पण वरिष्ठ निरीक्षकांना भेटूही दिले नाही. यात एका पोलीस अधिकाऱ्याने तर तुम्हाला सैराट घडवायचा आहे का, अशा शब्दात या प्रकरणाची अवहेलना केली. पोलीस दाद देत नाहीत आणि दारावे येथील ग्रामस्थ जगू देणार नाहीत यामुळे सोनावणे कुटुंबाने मंगळवारी माफी मागून हे प्रकरण संपविण्याचा निर्णय घेतला.
नेरुळ पोलिसांनी सोमवारी मुलीचे वडील, भाऊ यांना समज देऊन कोणतेही आतातायी पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला असता आणि स्टेट बँक ऑफ इंडिया वसाहतीतील रहिवाशांनी मंगळवारी स्वप्निलच्या कुटुंबाला आधार दिला असता तर कदाचित स्वप्निलचा जीव वाचला असता, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे मंगळवारी रात्रीपासून नेरुळ आणि दारावे गावात तणावाचे वातावरण होते. नेरुळ पोलीस ठाण्यावर स्वप्निलच्या नातेवाईक आणि मित्रांनी तीन वेळा धडक दिली. त्यामुळे एसबीआय वसाहत आणि दारावे येथे पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. राज्यात कोपर्डी प्रकरण गाजत असल्याने सर्व उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी नेरुळमध्ये तळ ठोकला होता. त्यामुळे बारा तासांत सात आरोपींना अटक केल्याने वातावरण आटोक्यात ठेवण्यात पोलिसांना यश आले होते.
प्रेमप्रकरणाच्या वादातून १६ वर्षांच्या स्वप्निल सोनावणे याची हत्या करण्यात आली. दारावे गावातील अल्पवयीन तरुणी आणि नेरुळ सेक्टर-१३ मधील एसबीआय वसाहतीत राहणारा स्वप्निल शहाजी सोनावणे या दोघांचे प्रेमप्रकरण शालेय जीवनापासून होते. नेरुळ येथील नूतन विद्यालयात या दोघांनी दहावी उत्तीर्ण केली होती.
सीबीडी येथील डी. वाय. पाटील विद्यालयात अकरावीसाठी स्वप्निलला ऑनलाइन प्रवेश मिळाल्याने त्याने मंगळवारी महाविद्यालयाचा पहिला दिवस भरला. स्वप्निलच्या प्रेमप्रकरणाची माहिती मुलीचा भाऊ सागर याला कळल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी त्याने दहा ते बारा मित्रांना घेऊन स्वप्निलच्या घरात घुसून दमदाटी करण्यास सुरुवात केली.
सागरने सोनावणे कुटुंबाला दारावे येथील घरी वडिलांची माफी मागण्यासाठी नेले. त्या वेळी दारावे येथे त्या ठिकाणी २० ते २५ जणांचा जमाव गोळा झाला होता. यात उरण, पनवेलमधील तरुणांचाही समावेश होता. या वेळी माफी मागण्यास आलेल्या सोनावणे कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. सोनावणे कुटुंबातील सदस्य जीव वाचविण्याच्या आकांताने पळू लागले. त्या वेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत किरकोळ शरीरयष्टी असलेल्या स्वप्निलच्या डोक्याला आणि छातीला बेदम मार लागला आणि स्वप्निल त्याच ठिकाणी कोसळला. एकीकडे बेदम मारहाण होतअसताना वडील शहाजी यांनी स्वप्निलला कसेबसे नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दहा वाजता आणले पण त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच स्वप्निलची प्राणज्योत मालवली होती.
माफी मागण्यास गेलेल्या स्वप्निलचा मोबाइल तपासण्यात आला. त्या वेळी त्या दोघांची काही छायाचित्रे आढळून आली आणि मुलीच्या भावाचा पारा चढल्याचे समजते. या सर्व प्रकरणांत पोलिसांनी सोनावणे कुटुंबाची तक्रार नोंदवून मुलीच्या कुटुंबाला समज दिली असती तर स्वप्निलचा जीव वाचला असता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याच वेळी मुलीचा भाऊ आणि त्याचे झिंगलेले मित्र धिंगाणा घालण्यास एसबीआय वसाहतीत आले असताना तेथील रहिवाशांनी त्याला विरोध केला असता तर सोनावणे कुटुंबाला बळ मिळाले असते. त्याचमुळे स्वप्निलचा मृतदेह वसाहतीच्या खुल्या सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवला असता जमलेल्या सर्व रहिवाशांना स्वप्निलच्या एका नातेवाईकाने सर्वानी बांगडय़ा भरा, असा दम भरून माघारी जाण्यास सांगितले तर एका नातेवाईकाने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना शिवांची लाखोली वाहिली. त्या वेळी वातावरण तंग झाले होते. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका अल्पवयीन तरुणाचा जीव गेल्याने पोलिसांनी एसबीआय वसाहतीली छावणीचे स्वरूप दिले होते. सर्वाची विचारपूस करून आत सोडले जात होते. प्रसारमाध्यमांना तर पाबंदी घातली गेली होती. त्यामुळे सोनावणे कुटुंबाच्या प्रतिक्रिया घेण्यास गेलेल्या पत्रकारांना माघारी फिरावे लागले होते.
खोटे सांगून सोसायटीत प्रवेश
सोनावणे कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते. या वेळी सागरने मित्रांच्या टोळक्याला घेऊन एसबीआयच्या सुरक्षारक्षक केबिनमध्ये अन्य एका मुलाचे नाव सांगून सोनावणे यांच्या घरात प्रवेश केला. त्या वेळी स्वप्निलचे वडील घरी नव्हते. हुल्लडबाज मित्रांनी सोनावणे यांच्या घरी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्याला जातिवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर स्वप्निलचे वडील घरी आल्यानंतर या तिघांना इमारतीच्या छतावर नेण्यात आले आणि छतावरून फेकून देण्याची धमकी देण्यात आली. त्या वेळी विशाल नावाच्या एका तरुणाने मुलीच्या भावाला असे करण्यापासून परावृत्त केल्यामुळे सोनावणे कुटुंब वाचले.