राज्य शासनाच्या  आशीर्वादाने  आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वराज क्रशर  स्टोन एल.एल.पी. कंपनीने पनवेल उरण परिसरातील दगड-खाणमालकांसोबत करार करून एकाधिकारशाही स्थापन केली आहे. त्यामुळे मनाला वाटेल तो दर लावून वाळू-खडी  विकली जात आहे. हे बंद करून न्यायालय अथवा लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी, अशी  मागणी  राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी संयुक्तरीत्या बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल-उरण भागात अनेक दगडखाणी आहेत. सध्या स्वराज क्रशर  स्टोन एल.एल.पी. कंपनीने सर्व दगड-खाणमालकांना एकत्रित केले असून, आता या पुढे ज्यांना माल हवा आहे, त्यांना केवळ स्वराज क्रशर स्टोन एल.एल.पी. कंपनीकडूनच खरेदी करावा लागत आहे. विशेष म्हणजे अशा एकाधिकारशाहीने मालाचा दर तिप्पट वाढवण्यात आला आहे. स्वराजने महसूल खाते ते मंत्रालयाचा पाठिंबा मिळवत लाखो-कोटींचा खनिकर्म घोटाळा केला आहे. हा घोटाळा कर्नाटक दगड-खाण घोटाळ्यापेक्षा मोठा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी संयुक्तपणे बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत केला. नवी मुंबईतील विमानतळबाधित क्षेत्रातील टेकड्या आणि डोंगर हटविण्याची नामी युक्ती लढवत सिडकोने येथील दगड उत्खननावरील रॉयल्टी माफ केल्याचे अध्यादेश काढले आणि घोटाळ्याला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला.

हेही वाचा >>> उरण मध्ये पावसाच्या तुरळक सरी; उष्म्यात सरीमुळे मातीचा सुगंध दरवळला

या सुवर्णसंधीचा फायदा उठवत दगड-खाणमालक, क्रशर मालकांना हाताशी धरून स्वराज क्रशर  स्टोन कंपनीचे भागीदार, गुंतवणूकदार यांनी दगड-खाणमालकांसोबत आपापसात करार करून त्यांच्या उत्पादनाविषयी नियमांचे स्वराज क्रशर स्टोन कंपनीने उल्लंघन केले आहे. याला  विरोध करणाऱ्या मालकांवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यात  दगड-खाणीची मोजणी नाही, खाणीतून किती ब्रास खनिज काढून विकले याची नोंद नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीच्या अध्यादेशापूर्वी विकलेले खनिजसुद्धा बेकायदेशीर आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. या घोटाळ्यात स्वराज क्रशर  स्टोनमालक सुनील म्हसकर, विराज आचरेकर, दादासाहेब सूर्यवंशी, लक्ष्य गुप्ता हे लोक  विमानतळाचे ठेकेदार भुसे याशिवाय ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे नाव पुढे करतात.  महाराष्ट्र सरकारचा अब्जावधी रुपयांचा महसूल चोरीला जात असल्याने या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच बांधकाम व्यवसायाशी प्रतरणा करून स्वराज कंपनी खडी, दगडाचे दर वाढवून घोटाळ्याची व्याप्ती वाढवत असल्याचा मोठा संशय पत्रकार परिषदेत  व्यक्त केला गेला. माजी खासदार  रामशेठ ठाकूर आणि जे. एम. म्हात्रे कंपनीच्या दगड-खाणी वगळण्यात आल्या आहेत, असा दावा कांतीलाल कडू यांनी केला. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, माजी नगरसेवक विक्रम शिंदे आदी उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaraj stone crusher llp mining scam more serious than karnataka s mining scam zws
First published on: 26-05-2023 at 16:13 IST