संतोष जाधव

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने आता सर्व वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ६०० वर्गखोल्यांत शिक्षणाच्या डिजिटल सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे ४२ हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक रंजक होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. त्यापैकी ५३ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा आहेत. कोपरखैरणे व सीवूड्स येथे यंदा सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शाळांत एकूण ५३३ कायम, तर ११६ ठोक मानधनावरील शिक्षक आहेत. ४८ शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. माध्यमिक विभागात १७ मुख्याध्यापक, ३५ कायम शिक्षक तसेच ३१ शिक्षणसेवक व ३२ ठोक मानधनावरील शिक्षक कार्यरत आहेत. डिजिटल शिक्षण यंत्रणा राबविण्यासाठी महापालिकेने रीतसर निविदा काढून माइंड टेक या बंगळुरूस्थित कंपनीकडून शाळांमध्ये डिजिटल सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून सर्व ६०० वर्ग डिजिटल करण्यात येत आहेत.

प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजिटल बोर्ड बसविण्याचे काम वेगात सुरू आहे. ईआरपी सिस्टम राबविण्यात येणार असून प्रत्येक मुलाने वर्गात प्रवेश केल्यानंतर त्याची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जाणार आहे. त्यानंतर मूल शाळेत आल्याचा एसएमएस पालकांच्या मोबाइल फोनवर जाणार आहे. प्रत्येक शाळेत संगणक कक्ष उभारण्यात येणार आहेत. तिथे ७ ते २५ संगणकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सर्वच माध्यमांचा अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ५ वर्षांत अभ्यासक्रम बदलला तर बदललेला अभ्यासक्रमही डिजिटल करून देण्याची अट निविदेत घालण्यात आली आहे. या संपूर्ण डिजिटल शिक्षणाच्या सुविधेची ५ वर्षे देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनी करणार आहे. त्यासाठीचा खर्चही ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इंटरनेट सुविधाही देण्यात येणार असल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती देऊ शकतील.

शालेय पोषण आहार, शिक्षक  व विद्यार्थ्यांची हजेरी अशी सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुविधा, देयकांतही सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता येणार आहे. २ ऑक्टोबपर्यंतही कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले.

या सुविधा मिळणार

* प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजिटल बोर्ड

* संगणक कक्ष, बायोमेट्रिक हजेरी

* विद्यार्थी शाळेत आल्यानंतर पालकांना एसएमएस

* संबंधित कंपनीकडे ५ वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी

* शालेय पोषण आहाराची देयके उपस्थितीप्रमाणे दिली जाणार

पालिकेच्या सर्वच शाळांत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र केली जाणार आहे. उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्यात येणार आहे. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा

नवी मुंबई पालिकेच्या शाळांत ई लर्निग सुविधा होती; परंतु तत्कालीन आयुक्तांनी ती बंद केली होती. आता डिजिटल शिक्षण देण्यासाठीचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. खासगी शाळांमध्ये या सर्व सुविधांसाठी फी आकारण्यात येते. पालिकेद्वारे सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

– जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई