१९११ पैकी आवश्यक मनुष्यबळ तात्पुरत्या सेवेत ठेवणार

नवी मुंबई: करोनाकाळातील संकटावर मात करण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या भरतीमधील अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर येणार आहे. आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भरतीप्रक्रिया राबवून १९११ उमेदवारांना भरती केले होते. मात्र, मे महिन्यापासून करोनास्थिती नियंत्रणात असल्याने त्यातील अनेकांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

सुरुवातीला पालिकेच्या वाशी रुग्णालयात करोना उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्र येथे १२०० खाटांचे जम्बो करोना उपचार केंद्र सुरू केले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी करोना काळजी केंद्र निर्माण केले होते.

पहिल्या करोनाच्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट मोठी होती. त्यामुळे एका दिवसात करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळत होते तसेच उपाचाराधीन रुग्णांची संख्याही कित्येक पटीत वाढलेली होती.

आता परिस्थिती व रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने तसेच नवी मुंबई शहरातील विविध राज्याच्या भवनामध्ये देण्यात आलेली जागा त्या त्या राज्याच्या मुख्य सचिवांकडून महापालिकेला रिकामे करून देण्याविषयी सांगण्यात आले आहे. सध्या असणारी आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

नवी मुंबई महापालिकेने करोनाच्या काळात मोठय़ा प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली होती. परंतु सध्याच्या आवश्यकतेनुसार आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना ठेवून अतिरिक्त डॉक्टर तसेच विविध पदावरील तात्पुरत्या सेवेतील कर्मचारी यांना कमी करण्यात येणार आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका