उरण : खोपटे पूल खड्ड्यामुळे रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या निखळल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या खोपटे पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
सहा महिन्यांपूर्वी खोपटे पुलाच्या दुरुस्तीची निविदा जाहीर करण्यात आली आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. मात्र आजपर्यंत या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या पुलाचे काम कधी सुरू होणार, असा सवाल येथील प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या वाढत्या पुलावरील खड्ड्यामुळे अवजड वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या खोपटे पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे.
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केलेली नाही. दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांबाबत अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याची माहिती खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी दिली आहे. तर वेळ पडल्यास आंदोलन करू, असे मत येथील स्थानिक प्रशांत रमेश ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या या पुलाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे, मात्र विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. अवजड वाहनाबरोबरच प्रवासी वाहनेही मोठया प्रमाणात प्रवास करीत आहेत. या प्रवासी वाहनांनाही धोका निर्माण झाला आहे.
खोपटे पूल ते कोप्रोली हा मार्गही धोकादायक झाला आहे. याचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे खोपटे पूल आणि मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
लोडबेरिंगने जोडलेल्या या पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे तो वारंवार नादुरुस्त होऊ लागला असून धोकादायक बनला असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जुना खोपटे पूल धोकादायक नाही. या पुलाची तपासणी करण्यात आली आहे. तर पुलाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी निविदा मंजूर करण्यात आली असून या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार या पुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुलावरील वारंवार उखडत असलेल्या धरावर उपाय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून थर टाकण्यात येणार आहे. – नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण.
