नवी मुंबई : नवी मुंबईत पाणी चोरी रोखण्यासाठी पालिका वेळोवेळी कारवाई करते, मात्र शहरात असलेल्या बहुतांश रोपवाटिकेतील हिरवाई मनपाच्या पाण्यावर बहरली जाते. हा राजरोसपणे होणारा व्यवसायिक वापराबाबत मात्र मनपा धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचा आरोप केला जात आहे.

नवी मुंबईत अनेक रोपवाटीका आहेत. मात्र त्यातील बहुतांश रोपवाटिकेतील रोपांना पाणी हे दुभाजकातील नळ अथवा नळातून चोरीने घेतले जाते. असाच एक प्रकार वाशीतील ब्ल्यू डायमंड चौकात होत आहे. या ठिकाणी चौकाच्या एका बाजूला रोप वाटिका आहे. मध्यवर्ती आणि दर्शनी भागात रोप वाटिका असल्याने ग्राहक मोठा आहे. येथील रोप वाटिकेत असलेल्या हजारो रोपांना दिले जाणारे पाणी हे मनपाने उभ्या केलेल्या एका धबधब्याचे वापरले जाते. या चौकाचे शुशोभीकरण करताना हा धबधबा बांधण्यात आला आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. धबधबाही रात्र वगळता तो दिवसभर सुरू असतो. धबधबा दिसण्यास छान व आकर्षक आहे. याच्याच पाण्यावर ही रोपवाटिका तगली आहे. या धबधब्यातील पाणी अशा पद्धतीने वापरणे पाणी चोरीचा गुन्हा आहे. तसेच हा पाण्याचा वापर व्यावसायिक वापर प्रकारात असून, वर्षानुवर्षे अशाच पद्धतीने पाण्याचा उपसा होत आहे, अशी माहिती येथील एका हॉटेल चालकाने दिली. 

हेही वाचा – नवी मुंबई: वर्षभरात १४ हजारांहून अधिक बेशिस्त वाहनांवर कारवाई

हेही वाचा – बेलापूर: खाऊगल्लीची हातपाय पसरी सुरु; नियमांना फाटा, पालिकेची कारवाई कधी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहजपणे जाता येता हा प्रकार नजरेस पडत असून, महानगरपालिका अथवा त्यांच्या भरारी पथकाला हे कसे दिसत नाही,असाही प्रश्न येथील बँकेत येणाऱ्या एका व्यक्तीने उपस्थित केला. विशेष म्हणजे, या रोपवाटिकेला देण्यात आलेली जागा ही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भागात आहे. मात्र रोपवाटिकेने हळूहळू रस्त्यावर येणे सुरू केले आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी वळण घेताना ही रोपवाटिका अडचणीची ठरते. याकडेही कारवाई केली जात नाही. याबाबत महानगरपालिकेचे वाशी सहाय्यक आयुक्त धनंजय धनवट यांना विचारणा केली असता, ही बाब आमच्या निदर्शनास आली असून, आम्ही याबाबत संबंधित व्यक्तीला नोटीस दिली आहे. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.