नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातून पुढील काही दिवसांत विमानोड्डाण सुरू होत असताना सिडको मंडळाच्या उच्चपदस्थांनी नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकास प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे. नैना प्रकल्पातील नगर परियोजना क्रमांक (टीपीएस) २ ते १२ यामध्ये तब्बल पावणेआठ हजार झाडांची कत्तल सिडको मंडळाला करावी लागणार असल्याची माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

नैना प्रकल्पाचा पर्यावरण अहवाल अद्याप टीपीएसमधील ३० गावांमधील शेतकऱ्यांना सिडको मंडळाने गावाच्या बांधावर जाऊन समजवलेला नसल्याने या प्रकल्पामुळे शेती नष्ट होऊन येथे नियोजित शहर निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे येथील शेतजमिनी नष्ट होत असल्याने येथील शेतकरी विकसक होण्याच्या वाटेवर आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत २५ किलोमीटर क्षेत्रावर नैना प्रकल्प हाेत आहे. मागील १२ वर्षांपासून या प्रकल्पाला संथगतीने असल्याने या प्रकल्पाचे काम सुरू होईल की नाही अशी साशंकता आहे. सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाच्या विकासकामांसाठी साडेसात हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा ठेका देण्यासाठी जोरदार पावले उचलली. येऊ घातलेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत निवड केलेल्या विकसक कंपन्यांनी साडेसात हजार कोटी रुपयांचे काम देण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे शेतजमीनीचे क्षेत्र कमी होऊन त्याऐवजी इमारतींचे विकसित भूखंडाचे वाटप होऊन अधिवासासाठी लागणारी पायाभूत सुविधा येथे पुढील काही वर्षांमध्ये उभारल्या जातील.

नैना प्रकल्पामध्ये अद्याप पर्यावरणाविषयी सिडको मंडळाने या परिसरात मागील १२ वर्षात कोणतीही जनजागृती केली नाही. त्यामुळे पर्यावरण दृष्टीकोनातून शेतकऱ्यांच्या बदलत्या जीवनशैलीवर होणारा परिणाम याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. नैना प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांपूर्वी झाडांची कत्तल करून या झाडांचे पुनर्रोपण कुठे करणार याची माहिती सिडकोचे अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही. याबाबत सिडकोच्या पर्यावरण विभागाने अद्याप नैना प्रकल्पाच्या झाडांची कत्तलीसाठी कोणत्याही विभागाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नैना प्रकल्पामधील झाडांच्या कत्तलीनंतर झाडांच्या पुनर्रोपण आणि संवर्धनाच्या कार्यक्रमाची माहिती सिडको अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही.

तिसऱ्या मुंबईच्या पायाभरणीसाठी नैना प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. तसाच हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. पनवेलच्या ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभारला जातोय, तो शेतकरी अद्याप या प्रकल्पात जमीन देण्यास नाखूष आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली त्याप्रमाणे नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपची सत्ता पनवेल, उरण आणि राज्यात व केंद्रात असल्याने शेतकऱ्यांचा आवाज राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचत नाही. विरोधी बाकावरील शेकापमध्ये पडलेल्या पक्ष फुटीमुळे नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी दुबळ्या शेकापमधील नेत्यांना झुंजावे लागणार आहे.

पुनर्रोपण कुठे?

नैना प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांपूर्वी झाडांची कत्तल करून या झाडांचे पुनर्रोपण कुठे करणार याची माहिती सिडकोचे अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही. याबाबत सिडकोच्या पर्यावरण विभागाने अद्याप नैना प्रकल्पाच्या झाडांची कत्तलीसाठी कोणत्याही विभागाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.