बोईसर: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील  सातीवली, जव्हार फाटा, नांदगाव आणि तलासरी हद्दीतील चार अपघातप्रवण ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत एक ते दीड वर्षापूर्वी  उड्डाणपूलांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या चार ही ठिकाणी  भरधाव वेगाने ये जा करणाऱ्या वाहनांच्या वेगाचा अंदाज न आल्याने विशेषतः रात्रीच्या अंधारात चारचाकी व दुचाकी वाहनांचा महामार्ग ओलांडताना वारंवार अपघात होऊन  त्यामध्ये आत्तापर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर   या अपघातप्रवण ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी स्थानिकांनी रेटून धरली होती. उड्डाणपूल उभारणीस दिरंगाई होत असल्याच्या विरोधात जव्हार फाटा येथे राजकीय पक्ष आणि संतप्त नागरिकांकडून महामार्गावरील वाहतूक रोखण्याचे आंदोलन देखील करण्यात आले होते.

 सातीवली, मनोर जवळील जव्हार फाटा आणि नांदगाव, तलासरी या अपघात प्रवण ठिकाणी वाहने आणि नागरिकांना महामार्ग सुरक्षित रित्या ओलांडता यावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी उड्डाणपूल निर्मितीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२३ मध्ये उड्डाणपूल निर्मितीस परवानगी देऊन निधी मंजूर केला होता. नियुक्त कंत्राटदाराने २०२४ मध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामास प्रारंभ केला मात्र त्याचवेळी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे कामाला देखील सुरुवात झाल्याने  घोडबंदर ते अच्छाड या १२१ किमीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत होते. याप्रकरणी  तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी संपूर्ण महामार्गाची पाहणी करून निर्धारित वेळेत उड्डाणपूलांची कामे पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांना निर्देश दिले होते. चार उड्डाणपूलांपैकी जव्हार फाटा, नांदगाव आणि तलासरी या तीन ही उड्डाणपूलांची कामे जवळपास पूर्ण झाली असून एका रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.  मात्र उड्डाणपुलाच्या बाजूच्या सेवा रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि पावसामुळे निर्माण झालेला चिखल यामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली असून यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील जव्हार फाटा, नांदगाव आणि तलासरी येथील उड्डाणपुलाची कामे पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र त्याचवेळी सातीवली येथील उड्डाणपुलाचे काम मात्र रखडले आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सातीवली उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर वळविण्यात आली असून या ठिकाणी वारंवार अपघाती घटना घडून नागरिकांचे बळी जात असल्याने या उड्डाणपुलाचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस, कुडे आणि दापचरी येथील नागरिकांना महामार्गाच्या पलीकडील बाजूस जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागतो.  या गावांच्या हद्दीत महामार्गाखाली भुयारी मार्ग उभारण्याची मागणी त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट झाल्याची तक्रार खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जव्हार फाटा, नांदगाव, आणि तलासरी येथील उड्डाणपूलांची कामे जवळपास पूर्ण झाली असून फक्त रंगरंगोटी बाकी आहे. मात्र पावसाच्या दिवसात वाहतूक कोंडी व वाहन चालकांना त्रास होऊ नये याकरिता उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सातीवली येथील उड्डाणपुलाचे काम पुढील दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.- सुहास चिटणीस प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण