घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटो चांगलेच लालेलाल झाल्याचे पहावयास मिळत आहे. एपीएमसी बाजारात ८०% टोमॅटो नाशिक मधून दाखल असून २०% इतर ठिकाणाहून आवक होत आहे. पावसामुळे ५० टक्के उत्पादन घटले असून एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत . मागील आठवड्यात ३० ते ३२ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेले टोमॅटो आता ३५ ते ४५ रुपयांवर विक्री होत आहेत.
हेही वाचा- डोंबिवली एमआयडीसीत दोन मोटार कार चालकांकडून डिझेलची चोरी
राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाला फटका बसत असून उत्पादन देखील घटले आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. आधी ३० ते ४० गाड्या आवक होती ती आता कमी झाली असून २० ते २५ गाड्या आवक असून त्यामुळे बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे. घाऊक बाजारामध्येच ३५ते ४५ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात ६० रुपयांनी विक्री होत आहे. बाजारात सध्या नाशिक मधील ८०% टोमॅटो दाखल होत आहे. बंगलोरमधून होणारी आवक ही पूर्णतः बंद आहे. त्यामुळे दरवाढ झाली असून अणखी काही दिवस दर चढेच राहतील अशी माहिती व्यापारी श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.