वाहतूकदार संपाचा फटका; आवकही घटली

नवी मुंबई वाहतूकदारांचा संप, बुधवारी पुकारण्यात आलेला बंद आणि पावसामुळे कर्नाटकातून कमी आवक झाल्याचा परिणाम वाशी बाजारातील टोमॅटोच्या किमतीवर पडला. गेल्या आठवडय़ात प्रतिकिलो २२ ते २४ रुपयांत मिळणारे टोमॅटो बुधवारपासून महागले आहेत. बाजारात टोमॅटोच्या दरात ८ ते १० रुपयांनी वाढ झाली. घाऊक बाजारात टोमॅटोचा प्रतिकिलो दर ३० ते ३२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तो ५० ते ६० रुपयांना मिळत आहे.

वाशी बाजारात पुणे, नाशिक आणि बंगळूरु येथून टोमॅटोची आवक होत असते. पावसाळ्यात साधारण टोमॅटोच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे थोडी घट असते. गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात ४० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होणारे टोमॅटो दोन दिवसांपासून ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. पावसाळ्यात टोमॅटोची आवक घटली आहे, परंतु काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या वाहतूक संपाचाही दराला फटका बसला. बेंगळूरुवरून दाखल होणाऱ्या उत्तम दर्जाच्या टोमॅटोच्या गाडय़ा कमी प्रमाणात येत असल्याने आवक कमी होत आहे.

एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण १ हजार ६८१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर किरकोळ बाजारात विक्रेते तो चढय़ा दराने विकत होते.