नवी मुंबई : उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा सर्वाधिक ताण एपीएमसी वाहतूक पोलिसांवर पडत आहे. एपीएमसी परिसरात दिवस-रात्र आवक सुरू असल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. भर उन्हात रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण करावे लागत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र व्यवस्थित नियोजन आणि वाढीव बंदोबस्ताची साथ मिळाल्याने वाहतूक सुरळीत होत आहे.

फेब्रुवारीच्या शेवटी कलिंगड, अननस, खरबूज या फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने वाहतुकीवर ताण पडला आहे. त्यात आता आंब्याची भर पडली आहे. एपीएमसी बाजारात दोनशे ते तीनशे ट्रक वाढल्याने परिसरात दुतर्फा पार्किंग करावी लागत आहे. या सर्वांचा ताण वाहतुकीवर पडला आहे. त्यात रात्रभर कृषी मालाची आवक आणि दिवसभर माल उतरवणे, चढवणे तसेच अन्य वाहतूक असल्याने वाहतूक पोलिसांवर वाहतूक नियंत्रणाचा ताण पडत होता. त्यात ऊन कडक वाढल्याने अनेकांना त्रासही सुरू झाला होता. यावर उपाययोजना करताना मुख्यालयाकडून अतिरिक्त मनुष्यबळ मिळाल्याने थोडा भार हलका झाला आहे. त्यामुळे आता थेट रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रित केली जात आहे.

वाहतूक नियंत्रणाचा सार्वधिक ताण हा तुर्भे स्मशानभूमी चौक, माथाडी चौक, सानपाडा चौक या ठिकाणी आहे. याशिवाय एपीएमसी आवारात बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर नजर ठेवावी लागते. त्यात मनुष्यबळ केवळ ३१ आहे. बीट चौकीत कायम तीन ते चार जण असतात. सुट्टीवर किमान पाच जण असतात. त्यामुळे प्रत्यक्षात २० /२१ कर्मचाऱ्यांवर काम भागवावे लागते. त्यात या ठिकाणी रात्रभर आणि दिवसाही मनुष्यबळ लागत असल्याने अतिरिक्त ताण पडतो. ही परिस्थिती ओळखून मागील आठवड्यात अतिरिक्त चार जणांची नेमणूक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालाची आवक आणि उन्हाचा चढता पारा त्यामुळे ताण पडत असला तरी अतिरिक्त मनुष्यबळ दिल्याने आता ताण पडत नाही. वाहतूक नियंत्रणाचे काम सलग न देता ठरावीक वेळाने बदली केली जाते व कर्तव्य बजावणाऱ्याला काही वेळ आराम दिला जातो. तसेच उन्हापासून काही त्रास होऊ नये याची काळजी कशी घ्यावी याच्या सूचना केल्या जातात. -शिवाजी भांडवलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक, एपीएमसी