करळ पूल आणि वाहतूक कोंडी हे एक समीकरणच बनले असून अनेक वर्षे लढे, आंदोलने करून ही कोंडी दूर होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पुलावरील एक मार्गिका प्रवासी व हलक्या वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आलेली असूनही चालकांच्या बेशिस्तपणामुळे व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे दररोज सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान येथे प्रचंड कोंडी होत आहे. चाकरमानी व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
दररोज सातआठ हजार जड कंटेनर वाहने तसेच शेकडो हलक्या व प्रवासी वाहनांची वाहतूक पंचवीस वर्षांपासून या पुलावरून होत आहे. या पुलाच्या दुरुस्ती व देखभालीवरही २० कोटींपेक्षा अधिक खर्च होऊनही त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सध्या करळ पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. मात्र त्याला पर्याय नसल्याने प्रवासी तसेच विद्यार्थ्यांनाही तेथूनच प्रवास करावा लागत आहे. करळ पुलाच्या खाली करळ फाटय़ावर सिग्नल यंत्रणा असली तरी तिचा वापर हवा तसा केला जात नसल्याने व बेशिस्तीने वाहतूक होत असल्याने दररोज करळ फाटा व करळ पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. या बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.