करंजाडे टोल नाक्यावर फाटकी नोट दिल्याने कर्मचाऱ्याचे कृत्य
पनवेल येथील करंजाडे टोल नाक्यावर सोमवारी दुपारी पाचशे रुपयांची फाटकी नोट दिल्याने ट्रकचालकाच्या पोटात लोखंडी सळई खुपसून जखमी करण्यात आले.
टोलवसुलीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कन्टेनरच्या काचा फोडून कन्टेनरचे नुकसान केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी टोलवसुली करणाऱ्या ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या (टीआयपीएल) दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सध्या जखमी कन्टेनरचालक कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे.
कळंबोली येथे राहणारे ५० वर्षीय जसबिंदर सिंग हे मालाने भरलेला कन्टेनर गोवा मार्गावरील सिलव्हर ग्लोबल यार्डमध्ये घेऊन जाताना ही घटना घडली. सिंग यांनी त्यांच्याजवळील ५०० रुपयांची नोट टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला दिली; परंतु ती नोट फाटकी असल्याने सिंग व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. यावरून त्यांनी सिंग यांना लोखंडी धारदार सळईने जखमी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीआयपीएल कंपनीवर कठोर कारवाई करू’
पोलीस अधिकारी बाजारे यांनी या प्रकरणी टोल नाक्याच्या व्यवस्थापकांना यापूर्वीही टोलवसुली करताना नम्रतेने वागण्याचे सूचनापत्र अनेकदा दिल्याचे म्हटले आहे. तरीही टोलवसुलीसाठी सक्ती आणि मारहाण होत असल्यास टीआयपीएल कंपनीवर कठोर कारवाई करणार असल्याचे ‘लोकसत्ता’ला बाजारे यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck drivers attack with metal rod
First published on: 08-12-2015 at 04:02 IST