नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांसह १२५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केली आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांवर कारवाई केली आहे. मुंढे यांनी नगरसेवक पद रद्द केलेले दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत.

शिवराम पाटील आणि अनिता पाटील या दोन नगरसेवकांची पदे तुकाराम मुंढेंकडून रद्द करण्यात आली आहेत. शिवराम पाटील नवी मुंबईच्या स्थायी समितीचे सभापती आहेत. तर त्यांच्या पत्नी अनिता पाटील या नवी मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका आहेत. अनिता पाटील या ३९ व्या प्रभागाचे तर शिवराम पाटील हे ४० व्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात.

शिवराम पाटील यांच्या कोपरखैराणेमधल्या हॉटेलच्या बांधकामात अनियमितता आढळल्याने तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सध्या हे हॉटेल शिवराम यांच्या मुलाच्या नावावर आहे. मात्र त्याआधी हे हॉटेल शिवराम यांच्या नावावर होते. शिवराम पाटील आणि अनिता पाटील यांच्यावरील कारवाईमुळे शिवसेना आणि मुंढे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांसोबतच दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवरदेखील तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तुकाराम मुंडे यांनी नियमितपणे कामावर न येणाऱ्या १२५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तुकाराम मुंढे यांना निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ५९ वाहक आणि ६६ चालकांना समावेश आहे. एका वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यालाही मुंढे यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे पालिका प्रशासन आणि नगरसेवक चांगलेच धास्तावले आहेत.