नवी मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर तुर्भेतील रामदास पाटील चौकातील पहिले घड्याळ टॉवर उभारले. मात्र आता ते दुरुस्तीअभावी बंद आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख जागा व चौकांत आकर्षक अशी शिल्प व प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे शहराच्या सौंद्र्यात भर पडली आहे. असाच एक महत्त्वाकांक्षी घड्याळ टॉवरचा प्रकल्प तुर्भे, एपीएमसीतील रामदास पाटील चौकात उभारण्यात आला आहे. १४ मीटर उंच असे हे घड्याळ टॉवर असून चारही दिशांना हे घड्याळ वेळ दर्शविते. याकरिता पालिकेने २० लाख रुपये खर्च केले आहेत, मात्र हे घड्याळ सध्या बंद अवस्थेत आहे.

हा चौक शीव-पनवेल महामार्ग, पामबीच रोड, वाशी, अरेंजा कॉर्नर या रस्त्यांना जोडले गेले असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहने तसेच नागरिकांची वर्दळ असते. मुंबईसह इतर शहरात मोठ्या उंचीची घड्याळ टॉवर पाहावयास मिळतात. त्याच धर्तीवर मे २०१९ मध्ये हे घड्याळ टॉवरची उभारणी करण्यात आली आहे.  हे घड्याळ बंद अवस्थेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

घड्याळ टॉवरला वीजपुरवठा होत नसल्याने ते बंद आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून याबाबत काम सुरू असून लवकरच ते सुरू करण्यात येईल.  -मनोज पाटील, कार्यकारी अभियंता, तुर्भे विभाग, महापालिका