तुर्भे-शिरवणेतील रस्त्यांचे कामे संथगतीने

शेखर हंप्रस, लोकसत्ता
नवी मुंबई : महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही प्रशासनांच्या वादात एमआयडीसीतील तुर्भे ते शिरवणे या पट्टय़ातील रस्त्यांची कामे गेली अनेक वर्षे रखडली होती. आता कुठे कामे सुरू झाली आहेत मात्र ती संथगतीने सुरू आहेत. मात्र इतकी वर्षे कामे न झाल्याने अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खडतर प्रवासाचा अनुभव नुकताच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा घेतला आहे. या रस्ते दुरवस्थेचा फटका उद्योजकांना बसत असून वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे.

एमआयडीसीतील तुर्भे ते शिरवणे या पट्टय़ात पटनी-दिघा ते शिरवणे असे एकूण १३६ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी ८६ किलोमीटर रस्त्यांची कामे नवी मुंबई महापालिकेने केली आहेत. तर रबाळे एमआयडीसीतील २१ किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांची कामे गेली पाच वर्षांपासून सुरू आहेत. याशिवाय २.५ किलोमीटरचा पटनी रस्ताही पूर्ण झाला असून काही तांत्रिक अडचणींमुळे केवळ या रस्त्याच्या कामाला काहीसा उशीर झाला असे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता हा दावा फोल ठरत असल्याचे दिसत आहे.

मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांची अवस्था कमीअधिक प्रमाणात खराबच आहे. त्यात तुर्भे भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. गावाकडील रस्ते बरे अशी म्हणण्याची वेळ येथील घटकांवर आली आहे. तुर्भे भूखंड क्रमांक डी २८५ च्या परिसरात तर अत्यंत वाईट अवस्था आहे. शिरवणे एमआयडीसीतील रस्तेही खराब झाले आहेत. येथील शीव-पनवेल महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याचे काम मात्र प्रगतीपथावर आहे.

मुख्य रस्ते चांगले बनवले आहेत. मात्र महावितरण, एमटीएनएल तसेच विविध कंपन्यांच्या इंटरनेट वाहिन्यांसाठी वारंवार ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खोदकामांनतंर खडी व मुरूम टाकून रस्ते बुजविल्यामुळे ते पावसामुळे पुन्हा उखडतात. अंतर्गत रस्त्यांची वाईट अवस्था आहे. आता कुठे रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र १५ वर्षांनंतर रस्त्यांची कामे सुरू आहेत, म्हणजे मूळ रस्त्यांची किती वाईट अवस्था असते ते पाहा, असे तुर्भे एमआयडीसीतील उद्योजक गणेश शेणॉय यांनी सांगितले.

रस्ते खराब असल्याने वाहन खूप काळजीपूर्वक चालवावे लागते. यात मालाचेही नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे आम्ही वाहतूक करताना साहित्याची हमी घेण्याचेच बंद केले आहे. त्यात रस्ते खराब असल्याने वाहनांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च वाढला असल्याचे टेम्पोचालक गणेश विचारे यांनी सांगितले.

‘डी’ भागात सर्वात खराब रस्ते आहेत. तुर्भे व शिरवणेतील बहुतांश रस्त्यांची काम सुरू आहेत, मात्र ती कासवगतीने. एकही रस्ता पूर्ण केलेला नाही.  काही ठिकाणीच कामे केली आहेत. त्यामुळे वाहनचालकांनाही मनस्ताप होत आहे. शिवाय हमखास वाहतूक कोंडी वा धीम्या गतीने वाहतूक सुरू  असते.

– दिलीप पाटील, उद्योजक, शिरवणे

तुर्भे आणि शिरवणेमधील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तुर्भे एमआयडीसीतील पोलीस ठाणे ते उरण फाटा हा ४.१ किलोमीटरचा रस्त्यासाठी ४२ कोटी तर तुर्भे डी भागातील शिरवणेतील ३.८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी तसेच अन्य अंतर्गत ४.९ किलोमीटर रस्त्यांची  ८९ कोटींची कामे सुरू आहे. सध्या रस्ते खराब आहेत हे मान्य आहे. मात्र एक ते दीड वर्षांत सर्व एमआयडीसी खड्डेमुक्त होईल.

– संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका

नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर घेते. १ डिसेंबर २००५ च्या करारानुसार रस्ते बांधणी महापालिकेने करावी असे ठरले आहे. त्यानुसार महापालिकेने काही रस्ते बनवले आहेत तर काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. रबाळे व महापेतील काही भागांतील ३५ किलोमीटरचे रस्त्याची कामे एमआयडीसीकडे आहेत.

– एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी