१५ दिवसांत २ अपघात; महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

तळोजा परिसरात विजेच्या तारा अंगावर पडून गेल्या १५ दिवसांत दोघांचे प्राण गेले आहेत. महावितरण कंपनीच्या जुनाट यंत्रणेमुळे रहिवाशांचा बळी जात आहे. त्यामुळे महावितरणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२७ जुनला दुपारी किरवली येथे राज पाटील हा मुलगा गावालगतच्या तलावात मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसला होता. त्याच वेळी तलावालगतचे झाड वीजवाहिनीवर पडले आणि वीजवाहिनीचा धक्का लागून राजचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पेणधर गावात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कुणाल पावशे (२९) याच्या अंगावर विजेची तार पडली आणि त्याचा मृत्यू झाला. कुणाल व त्याचे वडील केशव पावशे हे दुचाकी घेऊन गावातील इस्त्रीच्या दुकानातून कपडे आणण्यासाठी गेले होते. तेव्हा ही घटना घडली. कुणाल उभा असताना विजेच्या खांबावरील तार तुटून त्याच्या अंगावर पडली. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीचा ठपका ठेवला आहे.

खासगीकरणाचे दुष्परिणाम?

वीज महावितरण कंपनीने खासगीकरणाचे धोरण अवलंबल्याने विजेची गळती सर्वाधिक असणाऱ्या गावांतील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. खासगी कंपन्यांप्रमाणे काम सुरू असल्यामुळे जलद काम करणाऱ्या आणि कंपनीला महसूल मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. गेल्या पंधरवडय़ातील या दोन घटनांमुळे या चर्चेला खतपाणीच घातले गेले आहे. काही बडय़ा अधिकाऱ्यांनी कंपनीच्या उच्चपदस्थांपासून ते ऊर्जामंत्र्यांपर्यंत वशिलेबाजी करून स्वतचे स्थान प्रकाशगडावरच पक्के केल्याचे बोलले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज महावितरण कंपनीच्या कोणत्याही अभियंत्याला वीजग्राहकांच्या सुरक्षेपेक्षा स्वत:चे पद मोठे नाही. वशिलेबाजीने वीज महावितरण कंपनीत कोणतेही पद मिळत नाही. पनवेल ग्रामीणमध्ये पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळेच विजेचे ६० नवीन खांब काही दिवसांपूर्वी पनवेल ग्रामीणला दिले. गेट पॉवर कंपनीला दिलेले काम त्यांनी पूर्ण न केल्याने सुमारे तीन कोटी रुपये खर्च करूनही पनवेल ग्रामीण व उरण परिसरातील कामे अर्धवट आहेत. पनवेल ग्रामीणमधील सुमारे २२५ किलोमीटरची वीजवाहिनी टाकण्याचे काम तसेच एचटी ७५० आणि साडेचारशे एलटी पोल बदलण्याचे काम करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे काम सप्टेंबरमध्ये सुरू होईल. अपघात टाळावेत यासाठी महावितरण कंपनी नेहमीच झटत असते.

सतीश करपे, कोकण विभागीय संचालक, वीज महावितरण कंपनी