‘बहर’ संस्थेचा दावा; ‘ई बर्ड’संकेतस्थळावर नोंद
उरण : उरण तालुक्यात पाणथळ भाग मोठय़ा प्रमाणात असून या ठिकाणी दरवर्षी स्थलांतरित पक्षी येत असतात. यात यावर्षी बदकाच्या दोन नवीन प्रजाती दाखल झाल्याचा दावा बहर या संस्थेने केला आहे. युरोप व सायबेरियातून या प्रजाती पहिल्यांदाच आल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
लालसरी व नयनसरी अशी या बदकांची नावे असून ती उरण-पनवेल महामार्गालगत बेलपाडा गावानजीक आढळून आली आहेत.
उरण हे पक्षी निरीक्षकांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. या परिसरात अडीचशेपेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या जाती आढळून येतात. या मध्ये वेडा राघू (बी इटर), चमच्या (स्पून बिल), दयाळ(रॉबीन), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉक), नवरंग (इंडियन पिटा), ब्राह्मणी घार यांचा समावेश असतो. बदकांच्याही विविध प्रजाती आढळतात. यात थापटय़ा बदल (नॉर्थ शॉवेलर), तलवार बदक (नॉर्थन पिंटेल), चक्रांग बदक (कॉमन टिल), हळदी कुंकू बदक (इंडियन स्पॉट बिल्ड डक), चक्रवाक (रूडी शेल्डक) तसेच अडई (लेसर विसलिंग डक) यांचा समावेश असतो. मात्र यावर्षी लालसरी व नयनसरी या दोन नवीन प्रजाती आढळल्या आहेत. बहर या संस्थेच्या सदस्यांनी याची माहिती संग्रहित केली आहे. ई बर्ड संकेतस्थळावर या बदकांची नोंद करण्यात आल्याची माहिती बहर संस्थेचे वैभव पाटील यांनी दिली. पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत असताना नवीन प्रजाती आढळू येत आहेत, हे पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.