कच्च्या तेलाच्या महागाईमुळे १० ते १५ टक्के उद्योग बंद; कामगारांना वेतन देताना उद्योजकांची दमछाक

विकास महाडिक, लोकसत्ता

Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

नवी मुंबई : करोना साथीमुळे विस्कळीत झालेला उद्योग रुळांवर आणण्यासाठी झगडणाऱ्या उद्योगक्षेत्राला रशिया-युक्रेन युद्धाची जबर झळ बसली आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढू लागल्यामुळे त्यावर आधारित असलेल्या नवी मुंबई एमआयडीसी वसाहतीतील दहा ते पंधरा टक्के कारखान्यांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. तेलाचे दर परवडत नसल्याने कारखाने बंद ठेवावे लागत असून् कामगारांना मासिक वेतन देताना उद्योजकांची दमछाक होत आहे. अनेकांनी कामगारांना सोडचिठ्ठी देऊन गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.

दोन वर्षांपूर्वी करोना साथ सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे काही दिवस तग धरल्यानंतर परराज्यातील कामगारांनी गावी जाणे पसंत केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू झाले तरी गावी गेलेले हे सर्वच कामगार परतलेले नाहीत. त्यामुळे कामगार, मजूर कमतरतेमुळे अनेक कारखान्यांचे उत्पादन मंदावले आहे. याचवेळी कर्ज काढून उद्योग उभारणाऱ्या कारखानदारांना कर्जाचे हप्ते भरण्याचे संकट उभे राहिले आहे. करोनाच्या दोन वर्षांत अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला आहे तर काही कारखानदार टाळेबंदीच्या तयारीत आहेत. करोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे दिसत असतानाच रशिया-युक्रेन युध्द सुरू झाले.  त्यामुळे नवी मुंबई, तळोजा, या औद्योगिक वसाहतीत कच्चे तेल आणि आयातीवर अवलंबून असणारे प्लास्टिक, रंग आणि वाहनांचे तेल तयार करणाऱ्या कारखान्यांवर मोठा परिणाम झाला आहे. नवी मुंबईत पाच हजार छोटे मोठे कारखाने असून तळोजा एमआयडीसीतही दोन हजार कारखान्यांची संख्या आहे. यातील दीड ते दोन हजार कारखानदार टाळेबंदीच्या तयारीत आहेत.   या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखानदारांनी कारखाना भाडय़ाने देऊन मिळणाऱ्या भाडय़ावर समाधान मानण्यास सुरुवात केली आहे. भाडे आणि उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे शक्य होत नसल्याने अनेकांनी कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खैरणे एमआयडीसीत एका कारखान्यात वाहनांसाठी लागणारे विविध प्रकारचे ऑइल तयार केले जाते, मात्र मागील काही दिवस कारखाना बंद पडला असून कामगारांना वेतन देण्याची वेळ मालकांवर आली आहे. 

तेलामुळे सारे हतबल

भारतात लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ८५ टक्के तेल आयात केले जात असून अमेरिका, रशिया आणि सौदी अरेबिया हे सर्वाधिक जास्त तेल उत्पादक देश आहेत. भारताला लागणारे तेल हे सौदी अरेबियामधून आयात केले जात असले तरी युक्रेन रशिया युध्दामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतीवर झाला आहे, पण हेच तेल टीटीसी औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांना कच्चा माल म्हणून वापरावे लागत आहे. ते वाढलेल्या किमतीत खरेदी करणे शक्य नसल्याने कंपनीला टाळे मारण्याचा मार्ग या कारखानदारांनी अंगीकारला आहे.

करोनाच्या संकटातून देश सावरत असताना आता युध्दाने पुन्हा कारखानदार अडचणीत सापडले आहेत. अनेक कारखान्यांचा कच्चा माल हा परदेशातून आयात होणारे कच्चे तेल आहे. कच्च्या मालाच्या किमती दुप्पट झालेल्या आहेत. ते खरेदी करणे अशक्य आहे.  यामुळे एकूण उद्योगातील दहा ते पंधरा टक्के कारखाने आता शेवटच्या घटका मोजत आहेत.   -वामन नाडकर्णी, उद्योजक, टीटीसी, नवी मुंबई