उरण : सिडकोने उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या दुरुतीचे काम सुरू केले आहे. मात्र हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुलाच्या दुरुस्तीचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने ३१ जानेवारीची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे येथील बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या चार गावांतील हजारो नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उरण-पनवेल मुख्य मार्गावरील हा खाडीपूल कमकुवत असल्याने या मार्गावरील एसटी व एनएमएमटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. खाडीपूल त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी ऑक्टोबरमध्ये जनवादी महिला संघटनेने सिडको कार्यालयावर आंदोलन केले होते. त्यावेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता श्रीकांत गोसावी यांनी जानेवारी २०२४ पर्यंत पुलाची दुरुस्ती करून प्रवासी वाहनांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. मात्र काम पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. कारण पुलाचा मुख्य भाग अजून तसाच आहे.

हेही वाचा >>>पनवेलमध्ये आतापर्यंत कुणबी मराठा एकाच कुटूंबियांची नोंद आढळली

मागील तीन वर्षांपासून खाडीपूल प्रवासी वाहनांसाठी बंद असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी यांना अधिक वेळ आणि खर्चाचा प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून लांबलेला राज्य महामार्ग क्रमांक १०३ हा उरण चारफाटा, बोकडवीरा ते करळ फाटा असा साडेसहा किलोमीटरचा मार्ग १ सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाने सिडकोकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे मार्गावरील सिडको द्रोणागिरी कार्यालया समोरील खाडीपूल कधी दुरुस्त करणार असा सवाल नागरिकांकडून केला जात होता. या मार्गावरील हाईटगेटमुळे झालेल्या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हाईटगेटमुळे सार्वजनिक वाहतूक बंद

२०२१ सालापासून सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालय व फुंडे स्थानकालगतच्या नादुरुस्त खाडी पुलामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जड व प्रवासी वाहो रोखण्यासाठी उरण-पनवेल मार्गावर हाईटगेट बसविले आहेत. बोकडविरा व फुंडे महाविद्यालयाजवळील दोन्ही बाजूच्या हाईटगेटमुळे अधिक उंचीच्या वाहनचालकांना उंचीचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. उरण-पनवेल मार्गावरील पूल दुरुस्ती वेळेत न झाल्याने पुन्हा एकदा चार गावांतील नागरिकांना खर्चिक व लांबचा प्रवास करावा लागत आहे.