उरण नगरपालिका व वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना
उरण शहरातील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी,नागरिक तसेच व्यावसायिक अनेक वर्षांपासून त्रस्त झालेले असून यावर तोडगा काढण्याची मागणी सातत्याने होत होती. यावर उपाय म्हणून उरण नगरपालिका व उरणच्या वाहतूक पोलीस विभागाने बेकायदा वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन आणली आहे. शहरातील वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्याचे आवाहन वाहन चालकांना केले जात आहे, तसेच बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी दूर होऊन वाहन चालकांना शिस्त लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. उरण शहराचे क्षेत्रफळ अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर परिघाचे आहे. शहरालगतच्या वाढत्या नागरीकरणामुळे शहरात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे अनेकदा बेकायदा वाहन उभे करणे, बेशिस्तपणे वाहन चालविणे यामुळे शहरातील बाजारपेठ व मुख्य रस्त्यात वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे.
या वाहतूक कोंडीचा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत होता. उरण नगरपालिका व वाहतूक शाखेने चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी शहरातील काही ठिकाणे निश्चित करून तसे फलकही लावले आहेत. याची दखल न घेता बहुतांश ठिकाणी बेशिस्तीनेच वाहने लावली जात होती. नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी पुढाकार घेत नगरपालिकेतर्फे उरणच्या वाहतूक विभागाला टोइंग व्हॅन दिली. या व्हॅनच्या माध्यमातून बेकायदा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात उरणच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक किशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्राथमिक स्वरूपात सध्या वाहन चालकांना सूचना देऊन पार्किंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. सर्वानीच शिस्त पाळली तर कारवाईची वेळ येणार नाही. मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास शासकीय नियमानुसार कारवाई करून दंड आकारणी केली जाईल.