दररोज हजारो लिटर पाणी वाया
दुष्काळामुळे राज्यात माणसाचे जगणेच कठीण होऊन बसले असून पाणी वाचविणे ही सध्या काळाची गरज निर्माण झाली आहे. मात्र, उरण नगरपालिकेच्या कार्यालयाशेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीला अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. या टाकीतील हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असून ते गटारात वाहत जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या गळतीकडे येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
उरण नगरपालिकेला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीच्या जलवाहिनीतून दररोज ३५ दशलक्ष लिटर पाणी शहरातील नागरिकांना दिले जात आहे. शहरातील पाणीपुरवठय़ासाठी ठिकठिकाणी लाखो लिटर पाण्याची साठवणूक करणाऱ्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी उरण नगरपालिकेच्या कार्यालयासमोरच असलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने रस्त्यावर पाणी साचल्याची घटना घडली होती. टाकीतील पाणीपुरवठा करण्यात येणारा वॉल्व्ह खराब झाल्याचे कारण पुढे करण्यात आलेले होते. मात्र ही गळती अद्याप सुरूच असून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.
या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता, टाकीतील पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली असून त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्याकरिता स्ट्रक्चरल अभियंत्याचा अभिप्राय घेऊन ही गळती बंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले, तसेच शहरातील पाणीपुरवठय़ासाठी इतर ठिकाणी पाण्याच्या नव्या टाक्या उभारण्यात आल्याचेही ते म्हणाले.