नवी मुंबई : वाशीतील प्रसिद्ध आय सर्जन डॉक्टर बाप-लेकावर निष्काळजीपणाने डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. डी. व्ही. पंडित आणि त्यांचा मुलगा डॉ. चंदन पंडित, हे दोघे ‘पंडित आय सर्जरी अॅण्ड लेझर हॉस्पिटल’ (वाशी सेक्टर १०) मध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया करत होते. मात्र या शस्त्रक्रियांमुळे काही रुग्णांना गंभीर डोळ्याचं नुकसान झालं आहे.
डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत संबंधित रुग्णालयात पाच रुग्णांवर डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर या सर्व रुग्णांमध्ये एकसारखी लक्षणं दिसून आली — डोळ्यांत वेदना, दृष्टी कमी होणे, तसेच तीव्र जळजळ. तपासणीअंती सर्वांमध्ये ‘सुडोमोनास’ या घातक जीवाणूचा संसर्ग आढळून आला. या संसर्गामुळे काही रुग्णांच्या दृष्टीवर दीर्घकालीन परिणाम झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना आवश्यक ती स्वच्छता आणि वैद्यकीय प्रोटोकॉल न पाळल्याचा संशय पुढे आला आहे.
तक्रारीवरून चौकशी, चौकशीवरून गुन्हा दाखल कोपरखैरणे सेक्टर १४ येथील रहिवासी राजेंद्र गुप्ता यांनी या प्रकरणात सर्वप्रथम पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे उल्लेख असून, त्यावरून वाशी पोलिसांनी डॉक्टर बाप-लेकांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारदारांमध्ये किसन धनावडे, लक्ष्मी धनावडे (पती-पत्नी), संजीव गुप्ता आणि अंजनी सावंत यांचाही समावेश आहे. या सर्वांनी संबंधित रुग्णालयातच डोळ्याची शस्त्रक्रिया करवून घेतली होती. नोंदणी नूतनीकरण न करता सुरू ठेवले उपचार चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली संबंधित डॉक्टरांनी त्यांच्या नेत्रशस्त्रक्रिया पदवीची वैद्यकीय नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार नूतनीकरण केलेले नव्हते. नोंदणी कालबाह्य झाल्यानंतरही उपचार सुरू ठेवण्यात आले होते, हे गंभीर उल्लंघन मानले जात आहे.
या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र, रुग्णांच्या दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. “जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संबंधीत डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. सर्व तपासाअंती दोषींवर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येईल” आदिनाथ बुधवंत, साहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई</p>