वाशी पादचारी पूल दुर्घटनेच्या चौकशीचे पालिका आयुक्तांचे आदेश; वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाशी सेक्टर ८ येथील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाच्या कामाचे पालिकेने कार्यादेश ८ मार्च २०१९ रोजीच दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेळीच काम हाती घेतले असते तर दुर्घटना टाळता आली असती. पालिका आयुक्त सध्या लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्राबाहेर असून त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन जण जखमी झाल्याने पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत  भा.द.वि. कलम ३३७/३३८ व ३३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री या पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून सुरेंद्र पाल आणि जितेंद्र पाल हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यातील सुरेंद्र पाल यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या बरगडी, किडनीला मार लागला असून पालिका रुग्णालयातून ‘फोर्टीज’ला हलविण्यात आले आहे. २४ तास देखरखीखाली ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णलायाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी या पुलाची शहर अभियंता सुरेंद्र पाटील साहाय्यक आयुक्त सुधाकर समेळ यांनी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र या घटनेबाबत कोणीही काहीही बोलण्यास नकार देत आहेत.

मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने शहरातील पादचारी पुलांचा आढावा घेतल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असून त्यात या पुलाचाही समावेश होता. त्या अनुषंगाने पुलाच्या दुरुस्तीचे कार्यादेश ८ मार्च रोजीच देण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुलाच्या दोन्ही बाजूला पुलावर कोणी जाऊ  नये म्हणून आडवे बांबू बांधले आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे येणारे नागरिक येथे आले असता त्यांना पूल पाहून धक्काच बसला.

या पुलाबाबत अनिल फडके आणि सुहासिनी फडके या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याने पुलाच्या अवस्थेबाबत काही महिन्यांपूर्वी विभाग अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. त्या वेळी पाहणी करू एवढेच उत्तर त्यांना देण्यात आले असे फडके दाम्पत्यांनी सांगितले. तर संगीता शहा यांनी मी मुलांना घेऊन मिनी सी शोअरला याच पुलावरून जात असे असे सांगितले. स्थानिक नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी या घटनेबद्दल प्रशासनच जिम्मेदार असल्याचा आरोप केला आहे.

दुर्घटनेनंतरही सुरक्षा नाही

एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही याबाबत पालिका गंभीर नसल्याचे समोर आले आहे. पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे. मात्र केवळ पुलाचा प्रवेशद्वारावर काटेरी झुडपे व बांबू लावले आहेत. शेजारील भिंतीवरून अनेक जण या पुलाखाली जात असून दुर्घटनाग्रस्त पुलाची छायाचित्रे काढत आहेत, मात्र त्यांना कोणीही विचारत नाही. हा पुलाचा उर्वरित भागही पडू शकतो. त्यामुळे पुन्हा धोका निर्माण होऊ शकातो. मात्र याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नव्हती.

‘रेल्वे’कडून छायाचित्रण

या ठिकाणी रल्वेकडून भायखळा येथून दोन कर्मचारी आले होते. त्यांना विचारले असता अधिकाऱ्यांनी आम्हाला पाठवले असून पुलाची सद्य:स्थिती काय आहे याची छायाचित्रे काढण्यास सांगितले असल्याचे सांगितले.