वाहतुकीस अडथळा; गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी

नवी मुंबई : शहरात वाहनतळाअभावी पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. असे असले तरी वाशीत वाहनतळ असतानाही वाहनचालक आपली वाहने सेवा रस्त्यावरच लावत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

काही अंतरावरच वाहनतळ असताना केवळ दहा रुपये द्यावे लागतील म्हणून वाहनचालक या वाहनतळाचा वापर करीत नाहीत. यात अनेक महागडय़ा गाडय़ा असलेल्या वाहनमालकांचाही समावेश आहे. वाशी सेक्टर १६ परिसरात हा प्रकार होत आहे. 

नवी मुंबईत वाशी हे एक महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी सेक्टर १७ हा परिसर आर्थिक हब म्हणून ओळखले जाते. वाशी सेक्टर १५, १६, ९ आणि १० हा सर्व कायमच गजबजलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचीही मोठी गर्दी असते. या वाहनांच्या पार्किंगची समस्या या परिसरात मोठी आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी गटारावर एक वाहनतळ करण्यात  आले आहे. या वाहनतळाची क्षमता एका वेळी दीडशे वाहने बसतील अशी आहेत. मात्र या ठिकाणी वाहनचालक वाहने पार्किंग करण्याचे प्रमाण कमी आहे. दिवसभरात हे वाहनतळ रिकामेच असते. सकाळ व संध्याकाळी काही मोजकीच वाहने या ठिकाणी उभी असतात.

शेजारी हे वाहनतळ असताना वाहनमालक आपली वाहने सेवा रस्त्यावर दुतर्फा उभी करीत आहेत. अरेंजा चौकापर्यंत ही वाहने उभी असतात. वाहनतळ असताना बेकायदा पार्किंग करण्यात धन्यता मानली जाते. यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत असून गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे.  याबाबत वाहतूक पोलिसांनी सांगितले की या ठिकाणी सातत्याने कारवाई केली जाते. तरीही वाहने या ठिकाणी उभी केली जातात.

उच्चभ्रू वर्गालाही दहा रुपये परवडेनात या सेवा रस्त्यावर नजर टाकली तर या ठिकाणी अनेक महागडी वाहने उभी असतात. यातील एका वाहनचालकाला विचारले असता जाऊ  द्या हो, तेथे १० रुपये द्यावे लागतात..येथे फुकट वाहन उभे करता येते. व पोलीसही विचारत नाहीत, असे सांगितले. 

बेकायदा आणि बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई सुरू असून ही कारवाईत सेवा रस्त्यावरील वाहनांवरही केली जाते. वाहनमालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.

बाबूराव देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग वाशी