नाटय़निर्मात्यांच्या मागणीमुळे दिवाळीत बंद न ठेवण्याचा निर्णय

नवी मुंबई नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या दुरुस्तीचे काम दिवाळीनंतर हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी हा मराठी नाटय़निर्मात्यांना संजीवनी देणारा काळ असल्याने, या काळात नाटय़गृहाची दुरुस्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी नाटय़निर्मात्यांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये दुरुस्ती सुरू करण्यात येणार आसून त्यासाठी १३ कोटी ७९ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी दोनदा पाठ फिरवल्यानंतर तिसऱ्या वेळी एक कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे.

सिडकोकडून हस्तांतरित करून घेण्यात आलेल्या वाशी येथील भावे नाटय़गृहाची दुरवस्था झाली आहे. येथील ध्वनियंत्रणा जुनी झाली असून शेवटच्या प्रेक्षकापर्यंत आवाज पोहोचेनासा झाला आहे. रंगभूषा कक्ष, शौचालये, विश्राम कक्ष, वातानुकूल यंत्रणा कालबाह्य़ झाल्याने नाटय़प्रयोगाच्या वेळी अडचणी निर्माण होत आहेत. काही वर्षांपूर्वी कार्यक्रम सुरू असताना रंगमंचावरील छतातून पावसाच्या धारा लागल्या होत्या. त्यानंतर डागडुजी करून घेण्यात आली होती. प्रयोगाच्या वेळी डास मारण्याची कसरत प्रेक्षकांना करावी लागत आहे. आसनव्यवस्थेत तीन वेळा बदल करूनही आसने पाहून श्रीमंत पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. खुर्च्या तेलकट- मळकट झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर नाटय़गृहाचे नूतनीकरण करण्याची मागणी रसिकांतून होत होती.

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नाटय़गृहाच्या नूतनीकरणाला गेल्या वर्षीच मान्यता दिली आहे. त्यानंतर दोनदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नव्हता. जीएसटी आणि नोटाबंदीनंतर पालिकेच्या कंत्राटदारांची संख्या कमी झाली आहे. त्यात विद्यमान आयुक्त मंजूर खर्चापेक्षा जादा खर्चात काम करण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे दोन्ही वेळा दोनच कंत्राटदार या कामासाठी पुढे आले. अखेर ऑगस्टमध्ये आलेल्या निविदेनंतर हे काम एका कंत्राटदाराला देण्याचे निश्चित करण्यात आले.

गेल्या महिन्यात या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे असतानाच, अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह अनेक नाटय़निर्मात्यांनी पालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांची भेट घेऊन ही दुरुस्ती पुढे ढकलण्याची विनंती केली. दिवाळीचा काळ मराठी नाटय़निर्मात्यांसाठी सुगीचा काळ मानला जातो. याच काळात काही नवीन नाटकांचा मुहूर्त होतो. दिवाळीनंतर १५ दिवस सुटी असल्याने या काळात नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढते. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत दुरुस्ती सुरू करू नये, अशी मागणी या नाटय़निर्मात्यांनी केली आहे.

नाटय़निर्मात्यांनी फेब्रुवारीत परीक्षा सुरू होईपर्यंत ही डागडुजी करू नये, असे सुचविले होते, मात्र पुढील चार महिन्यांत नाटय़गृहाच्या बाहेरील भागाची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेचे स्वच्छतादूत असलेले शंकर महादेवन यांचा सल्ला घेण्यात आला आहे.

नाटय़गृहाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा अखेर निश्चित करण्यात आली आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होईल. प्रथम बाहेरील कामे केली जाणार असून आतील दुरुस्ती जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हाती घेण्यात येणार आहे.

– मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

* नूतनीकरण करताना पार्किंग, वाचनालय, फूडकोर्ट, तिकीट आरक्षण खिडकी अशा सर्व व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही सर्व व्यवस्था बाह्य़ भागात केली जाणार असल्याने ती डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. आसनबदल, ध्वनियंत्रणा, रंगमंच दुरुस्ती आणि प्रकाश योजना यांची कामे फेबुवारीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर चार महिने नाटय़गृह बंद राहणार आहे.