अत्यावश्यक सेवा थांबविण्याचा नवी मुंबई महापालिकेचा इशारा 

अनेक वेळा नोटीस बजावूनही ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायटय़ांच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवा यापुढे खंडित करण्यात येणार आहेत. स्वच्छतेत देशात आठव्या क्रमांकावर असलेल्या पालिकेने आता प्रथम क्रमांकासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्गिकरण सक्तीचे करण्यात आले आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात रोज ६०० मेट्रीक टन घनकचरा तयार होता. त्याची विल्हेवाट तुर्भे येथील कचराभूमीवर लावली जाते. केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीत घरगुती कचऱ्यात ओला व सुका वेगळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेने काही दिवसांपूर्वी ५००पेक्षा जास्त सोसायटय़ांना ओला व सुका कचरा वर्गीकरणासंदर्भात नोटिसा जारी केल्या होत्या. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याचे आदेश दिले होते. अनेक सोसायटय़ांबाहेर कचऱ्याचे ढिग जमा झाल्याने रहिवाशांत नाराजी पसरली होती. आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.

त्यानंतर काही कचरा वर्गीकरणास सुरुवात केली. तरीही शेकडो सोसायटय़ांतील रहिवासी आजही सुका व ओला कचरा एकत्रच टाकत आहेत. त्यामुळेच नोटीस देऊनही नियम न पाळणाऱ्या सोसायटय़ांचा पाणी पुरवठा खंडीत करण्याचे पाऊल उचलण्याचा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात ५०० पेक्षा जास्त सोसायटय़ांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनेक सोसायटय़ांनी अमंलबजावणी सुरू केली आहे. काही सोसायटय़ांनी अनेकदा सांगूनही त्यांच्या कारभारात सुधारणा केलेली नाही. त्यामुळे एमआरटीपी कायद्यानुसार या सोसायटय़ांवर कारवाई केली जाणार आहे.

तुषार पवार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका