लोकसंख्या वाढीबरोबर पनवेलचा पाणीप्रश्न गंभीर

परवडणारी घरे घेता येत असल्याने पनवेलमधील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे.

पनवेल : परवडणारी घरे घेता येत असल्याने पनवेलमधील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र  लोकसंख्या वाढीत नियंत्रण नसल्याने  शहरातील २० प्रभागांमध्ये लोकसंख्येत असमतोल निर्माण झाला असून  पाणीपुरवठय़ाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत आहे हे शहराचे वास्तव आहे. पनवेलच्या पर्यावरण अहवालात यावरच बोट ठेवण्यात आले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात आजही ३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा तुटवडा आहे. सिडको वसाहतींमध्ये १९५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तेथे २० दशलक्ष लिटर कमी पाणीपुरवठा होतो. पनवेल शहरातही जानेवारी महिन्यापासून एक दिवसाआड पाणीकपातीला सामोरे जावे लागते. तसेच २९ गावांमध्ये २० दशलक्ष लिटर मागणी आहे, मात्र तेथे ११ ते १२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

प्रति माणसी १३५ लिटर पाणीपुरवठा हा शासनाच्या नियमाप्रमाणे पाणीपुरवठय़ाचे आराखडे बांधले जातात. मात्र पाच सदस्य संख्या असणाऱ्या कुटुंबाला किमान अर्धा तासही पाणी येते ही मुख्य ओरड पनवेलकरांची आहे. सिडको वसाहतींसोबत मूळ पनवेल शहरातही हेच चित्र आहे. दीडशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या या शहरात किमान सहा महिने दिवसाआड पाणी येते. अजूनही टँकरने अनेक भागांत पाणीपुरवठा करावा लागतो. वसाहती उभारणाऱ्या सिडकोचे पाणी नियोजन कागदावरच आहे. पनवेल महापालिकेने पुढील २५ वर्षांचे पाणी नियोजनाचे धोरण आखले आहे, मात्र त्या योजनेतून प्रत्यक्षात पाणी मिळण्यासाठी अजून तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाणीप्रश्न गंभीर होण्याचे मूळ कारण असमतोल लोकसंख्या हे आहे. पनवेल पालिका क्षेत्राची रचना २० प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. या सर्व प्रभागांमध्ये लोकसंख्येत तफावत असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. प्रभाग क्रमांक ११ आणि ९ यांची रचना पाहता ही बाब स्पष्ट होते. महापालिका स्थापने वेळी २०११ साली झालेल्या जनगणनेच्या आधारावर ही रचना केली आहे.

पनवेल शहराची लोकसंख्येची एकूण घनता ४६३६ व्यक्ती प्रतिचौरस किलोमीटर आहे. यात प्रभाग क्रमांक १० मध्ये सवााधिक म्हणजेच ४२,८९२ आणि प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वात कमी ८९९ आहे. कमी घनता असलेल्या प्रभागांमध्ये गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि ९ अशा प्रभागांचा समावेश आहे. तर प्रभाग क्रमांक ८, १०, १२, १५ आणि १६ हे दाट लोकवस्तीचे आहेत. २६,००० आणि ३०,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक १० व ११ इतर प्रभागांच्या लोकसंख्येकडे नियोजनाची गरज आधोरेखित करण्यात आली असून यामुळे आर्थिक व सामाजिक पातळीवर समतोल राखण्यात याची मदत होईल असेही म्हटले आहे.

शुद्ध पाणी

पनवेल पालिका क्षेत्रातील ८८ टक्के नागरिक हे शुद्ध पाणी पीत असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. अवघ्या ६.९ टक्के नागरिकांनी अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. पूर्वीपेक्षा सध्याचे पाणी बरे असले तरी घरोघरी पाणी शुद्ध करण्यासाठी विविध पद्धती नागरिक वापरतात. जलजन्य आजारांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते.

अहवालातील ठळक मुद्दे

  • ६८.९ टक्के कामगार हे औद्योगिक वसाहतींत काम करत असून २२ टक्के व्यक्ती हे स्वयंरोजगार करतात. मजुरी करणाऱ्यांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. करोनाकाळात हा अहवाल बनविण्याचे काम हाती घेतल्याने करोनाचा मोठा परिणाम उद्योग व धंद्यांवर झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • ८१.५ टक्के कुटुंबप्रमुख साक्षर असून यात २५ टक्के उच्चशिक्षित आहेत. तर ७६.४ टक्के कुटुंबप्रमुखांनी माध्यमिक शिक्षण घेतलेले आहे. या साक्षरतेचा लाभ पनवेलच्या भविष्यातील उत्पन्नवाढीसह जातीचा सलोखा आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water crisis critical population growth ysh

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या