अन्नपूर्णा महिला मंडळ, वाशी

गिरणगावातील रहिवाशांचा दिवस जेव्हा गिरणीच्या भोंग्याने सुरू होत असे, त्या काळात महिलांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी पद्मश्री प्रेमाताई पुरव व कॉ. दादा पुरव यांनी दादर  ‘अन्नपूर्णा महिला मंडळा’ची स्थापना केली. १९९० साली या संस्थेची बिजे वाशी येथे पेरण्यात आली. आज  वंचित महिलांसाठी ही संस्था आधारवड ठरली आहे.

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्तिसंग्राम लढय़ात हिरिरीने भाग घेणाऱ्या पुरव दाम्पत्याने मुंबईतील झोपडपट्टीतील राहणाऱ्या दु:खी, पीडित, गरीब, वंचित, निराधार महिलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी एकत्र आणले. खाद्यनिर्मिती आणि विक्री करतानाच एकजुटीने जगण्याची, बिकट परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा दिली. वाशीत १९९०साली संस्थेचा कारभार सुरू झाला. खेडय़ापाडय़ांतून, आदिवासी भागांतून आलेल्या, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल महिलांना या संस्थेने एकत्र आणले.

आज अन्नपूर्णा महिला मंडळाचे काम पाच महत्त्वाच्या टप्प्यांवर जोमाने सुरू आहे. १९७५ साली सुरू झालेले अन्नपूर्णा महिला मंडळ, १९८६ साली सुरू झालेली अन्नपूर्णा महिला मल्टी स्टेट कॉ. क्रेडिट सोसायटी, २०००साली सुरू झालेले अन्नपूर्णा महिला मंडळ पुणे, २००३ साली सुरू झालेला अन्नपूर्णा परिवार विकास संवर्धन विभाग, २००७ मध्ये सुरू झालेली वात्सल्यपूर्ण स्वयंरोजगार सव्‍‌र्हिस को-ऑप. सोसायटी. एकाच छताखाली या सर्व विभागांचे काम मोठय़ा जोमाने आणि नीटनेटकेपणाने सुरू आहे.

प्रेमा पुरव आणि दादा पुरव यांच्याकडून त्यांची मुलगी डॉ. मेधा पुरव सामंत यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले. त्या आज संस्थेत सक्रिय आहेत. पती यशवंत सामंत यांचेही पाठबळ त्यांना लाभते. डॉ. मेधा यांनी १३ वर्षे बँकेत नोकरी केली आणि त्यानंतरचे संपूर्ण जीवन वंचितांच्या उद्धारासाठी समर्पित केले आहे. मेहनतीने नेटका संसार करण्याची उमेद त्या महिलांना देत आहेत. आई-वडिलांनी लावलेल्या अन्नपूर्णा महिला मंडळाच्या इवल्याशा रोपाला वटवृक्षाची महती मिळवून देण्यात डॉ. मेधा यांचा सिंहा वाटा आहे. त्यांनीच १९९३ पासून अन्नपूर्णा महिला मंडळाला अन्नपूर्णा परिवाराचे रूप दिले आहे.

डॉ. मेधाताई यांनी गरीब व वंचित, भाजीवाल्या महिलांना मायक्रो फायनान्सद्वारे वित्तपुरवठा केला आहे. या महिलांनी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून मोठी भरारी घेतली आहे. संस्थेची २०० कोटींची उलाढाल असून ४० कोटींच्या बचती आहेत. मुख्य कार्यालय पुण्यात तर विभागीय कार्यालय नवी मुंबईत आहे. मायक्रो फायनान्सद्वारे अन्नपूर्णा महिला क्रेडिट सोसायटीचे १ लाख सभासद आहेत. त्यात ९५ टक्के महिला तर ५ टक्के पुरुष सभासद आहेत. संस्था २०००पासून वडील नसलेल्या गरीब मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. बालवाडी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यातून ९६१ मुलांना सहकार्य केले जाते.

अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे आरोग्य  विमा योजना राबवून महिलांना अकस्मित दुर्घटनेवेळी सहकार्य केले जाते. २.५० लाख सभासदांना विमा कवच देण्यात आले आहे. तसेच महिला सभासदाचे अकस्मित निधन झाल्यास त्या महिलेचे कर्ज माफ करून कुटुंबालाही सहकार्य केले जाते. तसेच ज्येष्ठांसाठी दीर्घ मुदतीच्या ठेवी योजना २०१२ पासून राबविल्या जात आहेत. त्याचे १४ हजार सभासद आहेत. सध्या मुंबई व पुण्यात संस्थेद्वारे अशी २० पाळणाघरे चालवली जात आहेत. त्यामध्ये १ ते ६ वर्षे वयोगटातील सुमारे ५०० लहान मुले सांभाळली जात आहेत.

अन्नपूर्णा संस्थेतील महिलांची विविध समस्यांना तोंड देत प्रगती साधण्याची ऊर्मी हीच संस्थेच्या प्रगतीसाठी प्रेरणा असल्याचे डॉ. मेधा पुरव सामंत सांगतात.

पुरस्कार व गौरव

प्रेमाताईंनी दुर्बल घटकांतील महिलांसाठी केलेल्या कार्याची पद्मश्री डॉ. दुर्गाबाई देशमुख पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कॉ. दत्ता देशमुख पुरस्कार आणि मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानच्या आनंदमयी पुरस्कारातून दखल घेण्यात आली आहे. डॉ. मेधा पुरव सामंत यांना इंटरनॅशनल अवॉर्ड, आदिशक्ती पुरस्कार, वूमन लीडर इन मायक्रो फायनान्स, सन्मान गौरव पुरस्कार, झी मराठीचा उंच माझा झोका उत्कृष्ट ऑर्गनायझेशन पुरस्कार, नवी मुंबई पालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार, राज्य शासनाचा डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, फेमिना सुपर वुमन पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

संतोष जाधव santoshnjadhav7@gmail.com