लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : येथील मॅराथॉन नॅक्सॉन इमारतीत बुधवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत एका आईने आपल्या आठ वर्षीय मुलीला २९ व्या मजल्यावरून खाली ढकलले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित महिलेने देखील उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पनवेलमधील पळस्पे फाटा येथे मॅराथॉन नॅक्सॉन या उच्चभ्रू इमारतीत २९ व्या मजल्यावरील सदनिकेत आशिष दुवा आपल्या पत्नी आणि मुलीसह राहत होते. आशिष यांची पत्नी मैथिली (वय ३७) या काही काळापासून मानसिक तणावाखाली होत्या असे बोलले जात आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मैथिली यांनी आपल्या आठ वर्षीय मुली मायरा हिला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकले. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच मैथिली यांनी स्वतः उडी मारून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मैथिली यांच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मैथिली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस उपायुक्त प्रशांत मोहीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आणि मैथिली यांची ओळख महाविद्यालयीन जीवनात झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. आशिष मूळ आग्रा येथील असून त्यांचा कंत्राटी व्यवसाय आहे, तर मैथिली या गृहिणी होत्या. काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. बुधवारी सकाळी आशिष झोपेत असताना मैथिली यांनी आपल्या खोलीची कडी लावली आणि मुलीला आधी खाली फेकले. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.