प्रस्ताव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन
उरण : जेएनपीटीमधील कंटेनर टर्मिनलच्या खाजगीकरणाला वारंवार विरोध दाखवूनही हा प्रस्ताव रेटला जात असल्याने येथील कामगारांनी बुधवारी संताप व्यक्त केला. नियोजीत मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भव्य सभा घेत प्रस्ताव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी शेकडोच्या संख्येने जेएनपीटीचे कामगार व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व मावळचे खासदार श्रीरंग बारणे व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. जेएनपीटी प्रशासनाने खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा अशी मागणी करीत तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
जेएनपीटीमधील कंटेनर टर्मिनल हे तोटय़ात असून त्याचा पीपीपी धोरणातून विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार असून भूमिपुत्रांचेही प्रश्न प्रलंबित राहणार असल्याची भीती यावेळी कामगारांनी व्यक्त केली. बंदरांमध्ये जेएनपीटी हे एकमेव बंदर सरकारच्या मालकीचे असून ते नफ्यात असून त्याला तोटय़ात दाखवून हे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचे कामगार नेत्यांचे म्हणणे आहे.
यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी केंद्र सरकार व जेएनपीटी प्रशासनाचा समाचार घेत कोणत्याही परिस्थितीत जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करू दिले जाणार नाही. त्याकरिता शरद पवार यांना साकडे घालून दिल्लीपर्यंत हा प्रश्न घेऊन जाऊ. जेएनपीटी परिसरातील नागरिक हे लढाऊ आहेत. त्यांनी आपल्या जमिनी येथील बंदराच्या विकासासाठी दिल्या आहेत. त्यामुळे रोजगार हा त्यांचा हक्क कायम राहिला पाहिजे असे सांगितले.
तर श्रीरंग बारणे यांनी आपण या संदर्भात केंद्रीय नौकानयन मंत्र्यांशी चर्चा केली असून जेएनपीटीचे खाजगीकरण करणार नसल्याचे तसेच कोणताही प्रस्ताव मांडला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे या संदर्भात मंत्र्यांशीच चर्चा करू अशी भूमिका त्यांनी घेतली.
मोर्चासमोर जेएनपीटीचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संजय ठाकूर, विजय पाटील, गोपाळ पाटील यांची भाषणे झाली.