महापौर सुधाकर सोनावणे यांचे आवाहन; पर्यावरण दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुंदरतेला अधिक सुंदर बनविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी जी पावले उचलावी लागतील ती एकसाथ उचलूया. देशातील स्वच्छ शहरांमध्ये आठव्या क्रमांकावर असलेल्या आपल्या नवी मुंबईचा स्वच्छतेचा आलेख उंचावण्यासाठी सक्रिय राहू या, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सोमवारी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेरुळच्या वंडर्स पार्कमध्ये आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आणि स्वच्छ नवी मुंबई मिशनचे सदिच्छादूत सुप्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन उपस्थित होते.

‘स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर ती नियमितपणे करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी जिथे कचरा निर्माण होतो तिथेच त्याचे वर्गीकरण करण्याची सवय लावून घ्यावी. ओला आणि सुका कचरा महापालिकेच्या कचरागाडीतही वेगवेगळा द्यावा. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, प्रत्येक नागरिकाने याला हातभार लावावा,’ असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. आजपासून पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला घातक असणारा ई कचरा वेगळा करण्यासाठी निवडक ठिकाणी लाल डबा ठेवण्यात येईल. नागरिकांनी त्यात वापरात नसलेल्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ई-कचरा गोळा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

स्वच्छ नवी मुंबईचे सदिच्छादूत व संगीतकार-गायक शंकर महादेवन यांनी नवी मुंबईकर असल्याचा अभिमान वाटतो असे सांगत आपल्या नवी मुंबई शहराला देशात स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी एकजुटीने काम करू या, असे आवाहन केले. स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी गायलेले ‘गटार तुंबू देऊ  नका पाण्याचा होऊ दे निचरा, वेगवेगळा टाकत जाऊ  सुका नि ओला कचरा, रोगराईला दूर घालवू या, नवी मुंबई स्वच्छ, सुंदर नंदनवन बनवू या चक् चक् चक् चकाचक नवी मुंबई, चला बनवू या आज टकाटक नवी मुंबई’ हे स्वच्छतेचा संदेश देणारे जिंगलही महादेवन यांनी सादर केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली.

वंडर्स पार्कमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. पदपथांवर वृक्षारोपण केल्यास भविष्यात रस्त्यांच्या आणि अन्य विकासकामांत वृक्षांची हानी होते. त्यामुळे वृक्षारोपणासाठी अन्य जागा निवडाव्यात, असे आवाहन यावेळी पर्यावरणप्रेमींना करण्यात आले.

ई-कचऱ्यासाठी लाल डबा

घातक ई-कचरा संकलित करण्यासाठी इनऑर्बिट मॉल (वाशी), वंडर्स पार्क (नेरुळ), महापालिका मुख्यालय (सीबीडी, बेलापूर) येथे प्रायोगिक तत्त्वावर लाल रंगाचे डबे ठेवण्यात आले आहेत. वंडर्स पार्कमधील डब्याचे यावेळी शंकर महादेवन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महापालिकेतर्फे पंधरवडय़ातून एकदा ई-कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World environment day 2017 cleaning campaign organized by nmmc
First published on: 06-06-2017 at 04:40 IST