नवी मुंबई : वाशीतील युवा जलतरणपटू मंत्रा मंगेश कुऱ्हे हिने मलेशियामधील ‘इंटरनॅशनल ओशनमॅन चॅम्पियनशिप’मध्ये प्रथम क्रमांक पटकावत जागतिक पातळीवर यश संपादन केले. या स्पर्धेत ३७ देशांतील ७१० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. मंत्राने १२ ते १९ वयोगटात विशेष प्रावीण्य मिळवून, सर्व वयोगटांतील सर्वाधिक वेगाने पोहणारी महिला जलतरणपटू म्हणून गौरव मिळवला.
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून मंत्रा ही जलतरणाचा सराव करीत आहे. मंत्रा ही सध्या वाशीतील फादर अग्नेल ज्युनिअर महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत आहे. ती नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन (NMSA) येथे जलतरणाचे विशेष प्रशिक्षण घेत आहे. कृत्रिम तलावासह समुद्रात जलतरण करण्याचाही ती अभ्यास करते.
नुकतीच मलेशियात झालेल्या ‘इंटरनॅशनल ओशनमॅन चॅम्पियनशिप’ स्पर्धेत मंत्रा सहभागी झाली होती. १२ ते १९ या वयोगटात दोन किलो मीटर खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले. या स्पर्धेत जगभरातील ३७ देशांतील सुमारे ७१० जलतरणपटू सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मंत्रा हिला सर्व वयोगटातून सर्वाधिक वेगाने पोहणारी महिला जलतरणपटू म्हणून देखील गौरविण्यात आले. यानंतर दुबई येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड ओशनमॅन चॅम्पियनशिप’साठी मंत्राची निवड झाली आहे.
३०० हून अधिक पारितोषिके
मंत्राने वयाच्या १२ व्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये एलिफंटा ते गेटवेपर्यंतचे १४ किलोमीटरचे अंतर पार करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव कोरले होते. तसेच तिने, आतापर्यंत ३०० हून अधिक पारितोषिके मिळवली आहेत.
ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न
मलेशियात प्रथम क्रमांक मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे. माझे पुढील लक्ष्य ऑलिम्पिक असून, त्यासाठी मी सातत्याने मेहनत करत राहणार आहे, असे मंत्राने सांगितले.