दोघांना अटक; १० बंदुका जप्त

नवी मुंबई : ‘यूटय़ूब’वरील प्रात्यक्षिके पाहून १२ बोअरची रायफल तयार करून विकणाऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १० बंदुका आणि दोन काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.

परशुराम पिरकड आणि दत्ताराम पंडित अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील परशुराम हा सुतारकाम करतो तर दत्ताराम हा विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करतो.

दोघांची घट्ट मैत्री झाल्यानंतर त्यांनी पैसे कमावण्याचा नामी मार्ग शोधून काढला. सुतारकाम करता करता परशुराम हा बंदूक दुरुस्तीचे काम करीत होता, मात्र त्याच्याकडे याचा परवाना नव्हता, मात्र दोघांनी बंदुका तयार करून विकण्याची शक्कल लढवली. त्यानंतर दोघांनी मिळून बंदुका तयार करण्यासाठी ‘यूटय़ूब’वर ‘अपलोड’ करण्यात आलेल्या काही चित्रफिती पाहण्याचा सपाटा लावला. नंतर त्यांनी त्याबाबतची भरपूर माहिती मिळवली.

याच वेळी परशुराम याच्याकडे दुरुस्तीसाठी काही बंदुका येत होत्या. त्यातून त्याने काही साहित्य मिळविले आणि त्यातून त्याने बंदुका तयार करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी ‘१२ बोअर’च्या दहा बंदुका तयार केल्या.

बंदुका तयार करण्यासाठी छिद्र पाडणारे यंत्र (ड्रिल मशीन), ‘वेल्डिंग’ यंत्रणा, लोखंडी पट्टय़ा आणि लाकूड अशी सामग्री पनवेल, कुर्ला, कर्जत, खोपोली आणि चौक येथून मिळविल्या. परशुराम याला बंदुकीचा दस्ता उत्तमरीत्या तयार करता येत असल्याने अनेक प्रयत्नांनंतर बंदुका तयार केल्या. याच वेळी त्यांनी १२ बंदुकांची विक्रीही केली. हा सारा कारभार परशुराम याच्या नानिवली येथील शेतात केला जात होता, अशी माहिती उपायुक्त प्रवीण पाटील यांनी दिली.