अदा इ. योनाथ या १९३९ साली जेरुसलेममध्ये जन्मलेल्या महिलेला रसायनशास्त्रातील २००९ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. अदा योनाथ सध्या इस्रायलमधील वाइजमन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या हेलेन अँड मिल्टन सेंटर फॉर बायोमेट्रिकल स्ट्रक्चरच्या संचालिका आहेत. प्रत्येक प्राणिमात्राच्या शरीरातील सूक्ष्म घटक म्हणजे सेलमध्ये प्रक्रिया करून शरीराला योग्य अशी प्रथिने तयार करण्याची मोलॅक्युलर यंत्रणा असते. या यंत्रणेला रिबोसोम म्हणतात. या रिबोसोमची अंतर्गत रचना आणि त्याची कार्य करण्याची पद्धत यांच्यावर संशोधन करून त्याची माहिती उजेडात आणली म्हणून अदा योनाथ यांना रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार आणखी दोन शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन आणि थॉमस स्टेल्ट्झ यांच्याबरोबर विभागून देण्यात आला. अदा योनाथ ही जेरुसलेममधील एका रॅबीची म्हणजे ज्यू धर्मोपदेशकाची मुलगी. उपजीविकेसाठी त्यांचे लहानसे किराणाचे दुकान होते. हिब्रू युनिव्हर्सटिीतून रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतल्यावर अदाने जेरुसलेमच्या वाइजमन इन्स्टिटय़ूटमधून एक्सरे क्रिस्टलोग्राफी या विषयात पीएच.डी. केले. अदाने काही काळ शिकागो विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केल्यावर बíलनमधील मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधकांच्या गटाचे प्रमुखपद सांभाळले. पुढे त्यांनी इस्रायलमध्ये स्वत:ची प्रोटीन क्रिस्टलोग्राफी लॅबोरेटरी स्थापन केली. या संशोधनासाठी त्यांनी क्रायो बायो क्रिस्टलोग्राफी या नावाचे नवीनच तंत्र शोधून काढले. प्रत्येक प्राणिमात्राच्या शरीरातील सेलमध्ये सर्वात मोठा घटक रिबोसोम असतो आणि अमिनो अ‍ॅसिड एकत्र बांधून तो प्रथिने तयार करतो. रिबोसोमची संरचना आणि त्याची कार्यप्रणालीची माहिती शोधून काढल्यामुळे विविध अँटिबायोटिक्स औषधांचा या रिबोसोमवर कसा परिणाम होतो याची तपासणी आता करता येऊ लागली. औषध उत्पादकांच्या कामात अदा योनाथ यांच्या संशोधनामुळे मोठी प्रगती झाली. अदा योनाथच्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. इस्रायल आणि मध्यपूर्वेतील त्या पहिल्या नोबेल पुरस्कारप्राप्त महिला होत.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

वाळा

वाळा या वनस्पतीचं नाव घेताच आठवतं ते वाळ्याचं म्हणजेच खसचं सरबत. उन्हाळ्यात उष्णतेवर उपाय म्हणून वाळ्याचं सरबत उपयुक्त ठरतं. वाळा ही बहुवार्षकि तृणवर्गीय वनस्पती आहे. वाळ्याचं शास्त्रीय नाव क्रिसोपोगॉन जिजॅनिओडिस आणि इंग्रजीत याला वेटिवर असं म्हणतात. वाळ्याची मुळे सुगंधी असून त्यात उष्णतानाशक गुणधर्म असतात. या गवताचा उपयोग उन्हाळ्यापासून संरक्षण म्हणून पडदे बनवण्यासाठी करतात. पाण्यात वाळा टाकून ठेवलेलं पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरतात.

वाळा हे गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतुमय मुळे असून ती अतिशय खोलवर जातात. याची मुळे सुवासिक असतात. मुळांचा रंग फिकट पिवळा किंवा पिवळसर-तपकिरी असतो. विशेषत: वाळा हा कोरडय़ा हवामानामध्ये काढल्यामुळे त्यातील तेलाचे प्रमाण जास्तीत जास्त आणि उत्कृष्ट दर्जाचे असते.

पाने गवतासारखी ३० ते ९० सें.मी. लांब असून रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. फुले काळपट पिवळसर रंगाची असतात. या फुलांना देठे नसतात. फुलांचा दांडा मात्र लांब आणि पिरॅमिडच्या आकाराचा असतो.

वाळा तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठय़ा प्रमाणावर केला जातो. हे तेल गुलाब, चंदन यांसारख्या अन्य सुगंधी तेलाबरोबर चांगले मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. खरं तर हे गवत फारच उपयुक्त आहे. मुसळधार पावसाने जमिनीची धूप होते, भूस्खलन होते. वाळा या गवताची लागवड जमिनीची धूप थांबविण्यासाठी केली जाते. इतर गवतांची मुळे फार खोलवर जात नाहीत, वाळा या गवताची मुळे मात्र जमिनीत खोल जातात. सन २००५ च्या जवळपास कोकण रेल्वेकाठच्या दरडी कोसळू नयेत म्हणून या दरडीवर ही वनस्पती लावली आहे. सन २०१३ मध्ये ‘कोईमतूर नेहरू कला आणि विज्ञान केंद्राने’ निलगिरी पर्वतांच्या भागातील जमिनीची धूप थांबविण्यासाठी याचा वापर केला होता. ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरात नेहमी भूस्खलन होत असते. सन २०१४ मध्ये आसाममधील गुवाहट्टी येथे भूस्खलन झाल्यावर ‘आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन’ अधिकाऱ्यांनी आसाममध्ये ३६६ भूस्खलन क्षेत्रावर वाळा गवत लावण्याचा प्रकल्प डॉ. शंतनू भट्टाचार्य या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.

अनघा वक्टे (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org