आपल्या गर्भातील रसायनशास्त्राचे सूत्र इतक्या समर्पकपणे व्यक्त करणारे नाव असणारे मूलद्रव्य म्हणजे अँटिमनी. एकटय़ाने राहायला न आवडणारा (अँटी+मोनास) पण विपुलतेने आपल्या विविध संयुगांत रमणारा असे वर्णन या मूलद्रव्याचे करता येईल. मानवाला ज्ञात असलेल्या पुरातन मूलद्रव्यांमध्ये अँटिमनीचा समावेश होतो. याबाबतचे संदर्भ किमान पाच हजार वर्षांपासूनचे सापडतात. काळेशार व मूलायम असे स्टिबनाइट, म्हणजेच अँटिमनी सल्फाइड (Sb2S3) हे इसवीसनपूर्व चार हजार वर्षांपासून स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनांत वापरले जात होते. मूलद्रव्य म्हणून ठिसूळ असणारा अँटिमनी, संमिश्र धातूत परिवर्तित होताच कणखर होतो, जसे बॅटरीमध्ये वापरले जाणारे शिसे आणि अँटिमनीचा मिश्र धातू. अँटिमनीचे रसायनशास्त्र खूपच रोचक आहे. किमयागारांच्या सोनं बनवण्याच्या ध्यासातील एक टप्पा म्हणजे तांबे व अँटिमनीपासून बनवला जाणारा मिश्र धातू – अवघे सहा टक्के अँटिमनीचे प्रमाण व हुबेहूब सोनेच! फक्त जाणकार आणि अग्नीच काय ते वेगळं करू शकेल, त्याला शूद्ध सोन्यापासून. १८९१मध्ये डिंग्लरने अशा पद्धतीने सोने बनवण्याचे पेटंट मिळविले. याच अँटिमनीच्या स्टिबनाइटचा उपयोग सोने शुद्ध करण्यासाठी होतो. त्याचे रसायनशास्त्र उल्लेखनीय आहे. स्टिबनाइटमधील गंधक व अशुद्ध सोन्यातील मूलद्रव्यांची संयुगं तयार होतात व त्यांची मळी होऊन ती वेगळी होते. याच वेळी अँटिमनी – सोने असा मिश्र धातू तयार होतो. उच्च तापमानात  अँटिमनी उकळवून शूद्ध सोन्यापासून वेगळे केले जाते.

अँटिमनीप्रमाणेच काळ्याशा स्टिबनाइटलादेखील अनेकदा मूलद्रव्य समजले जायचे. काळ्या स्टिबनाइटप्रमाणेच अँटिमनीचे नारंगी रंगाचे आणखी एक सल्फाइड (Sb3S5) आहे. गमतीची गोष्ट अशी की सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोममधील विचारवंत थोरल्या प्लिनीने त्यांचे नामकरण अनुक्रमे मादा व नर अँटिमनी असे केले.

नासक्या अंडय़ाच्या वासाचे वायूरूपी स्टिबाइन हे संयुग अस्थिर असून अँटिमनी व हायड्रोजनमध्ये विघटित होते. हवेच्या संपर्कात हीच प्रक्रिया विस्फोटक होते. घरांमध्ये वापरात येणाऱ्या इनव्हर्टरच्या बॅटरीत लेड-अँटिमनी हा मिश्र धातू वापरला जातो. बॅटरीतील सल्फ्युरिक आम्लाची या मिश्र धातूतील अँटिमनीबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन स्टिबाइन तयार होते. म्हणून अशी बॅटरी वापरताना त्यातील पाण्याची पातळी राखणे महत्त्वाचे ठरते. रेचक म्हणून अँटिमनीची गोळी तसेच पोटॅशियमबरोबरीचे अँटिमनी, विषबाधा झाल्यास वांती होण्यास वापरले जाई, असे दाखले सापडतात.

– डॉ. रवींद्र देशमुख

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org