डॉ. शिवराम गर्जे

नोबेलिअमचे नाव डायनामाइटचा निर्माता शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले. याच्या शोधाचे श्रेय जॉर्जी फ्लेरॉव व अल्बर्ट घिओर्सो यांच्या दोन वेगवेगळ्या समूहांना जाते.

नोबेलिअमच्या शोधाचा इतिहास मोठा नाटय़मय आणि विवादात्मक आहे. स्वीडन, अमेरिका आणि रशिया येथील तीन संशोधन गटांनी नोबेलिअम शोधाचा दावा केला होता. या मूलद्रव्याच्या शोधाचे श्रेय कोणाला द्यावे व त्याचे नाव काय असावे हे कोडे सुटण्यास १९९७ साल म्हणजे त्याच्या शोधानंतर जवळपास ४० वर्षेलागली.

१९५६ मध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, मॉस्को येथील जॉर्जी फ्लेरॉव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लुटोनिअम-२४१ वर ऑक्सिजन-१६ कणांचा मारा करून नोबेलिअमची निर्मिती केली. परंतु त्या काळी समस्थानिकांना ओळखण्यात असणाऱ्या त्रुटीमुळे त्यांनी नवीन मूलद्रव्याचा शोध प्रकाशित केला नाही. त्यांनी या मूलद्रव्याला आयरिन जोलिओट क्युरी यांच्या सन्मानार्थ जोलिओटिअम (ख) असे नाव देण्याचाही विचार केला होता.

सर्वप्रथम नोबेल इन्स्टिटय़ूट, स्टॉकहोम येथील वैज्ञानिकांनी नोबेलिअमच्या शोधाची घोषणा १९५७ मध्ये केली. त्यासाठी त्यांनी क्युरिअम-२४४ ते २४७ या समस्थानिकांवर कार्बन कणांचा मारा केला. त्यांनीच या नवीन मूलद्रव्याचे नोबेलिअम हे नाव सुचविले. पुढे हाच प्रयोग १९५८ मध्ये लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरी (एलबीएल) येथे अल्बर्ट घिओर्सो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून पाहिला व त्या प्रकारचे नवीन मूलद्रव्य मिळत नसल्याचे नमूद केले. परंतु ते वेगळ्या पद्धतीने मिळाल्याचा दावा केला. पुन्हा एकदा १९५९ मध्ये नोबेल इन्स्टिटय़ूटच्या वैज्ञानिकांनी एलबीएलच्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगितले. नोबेल इन्स्टिटय़ूट आणि एलबीएल प्रयोगशाळेतील शास्रज्ञांचे वाद चालू असतानाच रशियातील ‘रशियन जॉइंट इन्स्टिटय़ूट फॉर न्युक्लिअर रिसर्च (जेआयएनआर)’ या संस्थेने नोबेलिअमच्या शोधावर सखोल संशोधन केले. त्यांनी एलबीएल प्रयोगशाळेत हे मूलद्रव्य मिळाले नसल्याचे नमूद केले. तसेच १९५६ मध्ये जॉर्जी फ्लेरॉव व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेले मूलद्रव्य नोबेलिअमच होते हे त्यांनी सिद्ध केले. शेवटी जेआयएनआर प्रयोगशाळेत १९६३ मध्ये अमेरिशिअम-२४३ वर नायट्रोजन-१५ कणांचा मारा करून नोबेलिअम-२५४ मिळविण्यात शास्त्रज्ञांना नि:संदिग्ध यश मिळाले. शेवटी टीडब्ल्यूजी आणि आयुपॅक यांनी नोबेलिअमच्या शोधाचे श्रेय जेआयएनआर प्रयोगशाळेला देण्यात यावे. परंतु या मूलद्रव्याचे नाव नोबेलिअम असेच ठेवावे, असा निर्णय दिला आणि या वादावर पडदा पडला.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org