News Flash

नवदेशांचा उदयास्त : ब्रिटिशांचे बहामाज्..

१७८२ साली अमेरिकी नौदलाने बहामाज्वर हल्ला करून विनासायास त्यावर कब्जा केला.

अमेरिकी नौदलाचा हल्ला

अटलांटिक महासागरात फ्लोरिडाच्या दक्षिणेला असलेल्या बहामाज् बेटसमूहाचे नाव हे तेथील आदिवासी तायनोंच्या बोलीभाषेतल्या ‘बा हा मा’ या शब्दसमूहावरून आले असावे. या शब्दसमूहाचा अर्थ ‘उंचावरचे मोठे पठार’ असा होतो. या बेटांवर प्रथम आलेले युरोपीय म्हणजे स्पॅनिश लोक. त्यांनी मूळ रहिवाशी तायनोंना गुलाम बनवून इतर वसाहतींवर नेल्याने बहामाज् बेटे ओसाड झाली. तरीही सोळाव्या शतकात फ्रेंच, ब्रिटिश आणि डचांनी तिथे आपापल्या वसाहती स्थापण्याचे प्रयत्न केले. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. ब्रिटिशांनीही १६३० सालापासून बहामाज्मध्ये वस्ती करण्याचे प्रयत्न केले. पुढे विल्यम सेली हा प्रोटेस्टंट ख्रिस्ती ब्रिटिश जमीनदार इंग्लंडमधील धार्मिक मतभिन्नता सहन न होऊन धार्मिक स्वातंत्र्यासाठी बम्र्युडा प्रदेशात राहावयास गेला. सेलीबरोबरच ब्रिटिशांच्या एका मोठय़ा गटाने बम्र्युडामध्ये स्थलांतर केले. यातील काही ब्रिटिश कुटुंबांनी पुढे बहामाज्च्या एका बेटावर वस्ती केली.

नंतर १६७० साली, ब्रिटिश राजा चार्ल्स द्वितीय याने बहामाज् बेटांवर वस्ती व्हावी म्हणून उत्तर अमेरिकेतल्या कॅरोलिनाच्या धनिक ब्रिटिश उमरावांसाठी एक योजना अमलात आणली. बहामाज्ची काही बेटे राजाने या धनिकांना व्यापारासाठी, करवसुलीसाठी तसेच तिथे शेती करून बेटाचे प्रशासन सांभाळण्यासाठी भाडेतत्त्वावर कराराने दिली. या काळात बहामाज्ची बेटे ही समुद्री चाचेगिरीचे अड्डे बनले. या चाच्यांच्या मदतीने फ्रेंच, स्पॅनिश लोकही या बेटांवर राहणाऱ्या ब्रिटिशांवर हल्ले करीत. अखेरीस या बेटांवरचे प्रशासन सुरळीत करण्यासाठी ब्रिटिशांनी बहामाज् बेटे ही ब्रिटिश साम्राज्याची वसाहत असल्याची घोषणा १७१८ साली करून वूड्स रॉजर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची वसाहतीच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली.

ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनाने अनेक ब्रिटिश कुटुंबे या नवीन वसाहतीत स्थायिक झाल्यावर स्थानिक नगर परिषदा स्थापन करून अंतर्गत प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यात आली. अठराव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकी स्वातंत्र्य युद्धकाळात अमेरिकी स्वातंत्र्यवादी फौजांचे ब्रिटिश बहामाज् हे लक्ष्य झाले. १७८२ साली अमेरिकी नौदलाने बहामाज्वर हल्ला करून विनासायास त्यावर कब्जा केला. बहामाज् ही जरी ब्रिटिश वसाहत असली, तरी त्या बेटांवर त्यांची संरक्षण सिद्धता अगदीच जुजबी होती.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 3:33 am

Web Title: article about islands of the bahamas history of bahamas zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : तायनोंचे बहामाज्…
2 कुतूहल : संख्याशास्त्रीय आलेखांचे अर्थ
3 नवदेशांचा उदयास्त : वादळी ग्रेनाडा
Just Now!
X